Pune: कॅम्पमधील 'मॉडर्न डेअरी'ला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 02:23 PM2024-01-23T14:23:41+5:302024-01-23T14:24:59+5:30
चार अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती पुणे कॅन्टोन्मेंटचे अग्निशमन दल प्रमुख रोहित रणपिसे यांनी 'लोकमत'ला दिली....
लष्कर (पुणे) : लष्कर भागातील शिवाजी मार्केटजवळील प्रसिद्ध मॉडर्न डेअरीच्या पहिल्या मजल्याला सायंकाळी ८:५०च्या दरम्यान मंगळवारी (दि. २२) आग लागल्याची घटना घडली असून, दोन तास अथक प्रयत्नांतून चार अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती पुणे कॅन्टोन्मेंटचे अग्निशमन दल प्रमुख रोहित रणपिसे यांनी 'लोकमत'ला दिली.
याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडर्न डेअरीजवळच राम मंदिर लोकार्पण सोहळा सुरू होता, त्यादरम्यान फटाके उडवण्यात आले होते. त्यातील एक फटाका वर उडत मॉडर्न डेअरीच्या अनधिकृत पहिल्या मजल्यावरच्या पत्राच्या शेडवर पडल्याने आग वाढत जाऊन जवळपास पाच हजार चौरस फूट इतके पत्र्याचे शेड जाळून खाक झाले आहे. या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकॉल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती ती सर्व जाळून खाक झाली. ही डेअरी गोविंद भगतानी यांच्या मालकीची असल्याचे कळते.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट
शहरात सर्वत्र सुरु असलेल्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आयुक्त रितेश कुमार यांनी दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करून घटनेची माहिती दिली. यावेळी उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र मोरे, राईस सा. शेख, तेलंगे, महेश चौधर आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
मी कॅम्पमध्येच होतो. आगीची माहिती मिळताच प्रत्यक्षस्थळी धाव घेतली. याबाबत उद्या अधिकची माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजनासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगणार आहे.
सचिन माथूरावाला, प्रशासन, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड