शनिवार पेठेतील इमारतीला भीषण आग, 26 नागरिकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:18 AM2019-05-16T10:18:15+5:302019-05-16T10:51:07+5:30
शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामाला गुरुवारी (16 मे) सकाळी भीषण आग लागली आहे.
पुणे : शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामाला गुरुवारी (16 मे) सकाळी भीषण आग लागली आहे. आगीबरोबरच धुराचे प्रमाण प्रचंड असल्याने त्याचा इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ लागला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी धुरात अडकलेल्या चार लोकांची सुटका केली. तसेच आग लागल्याने इमारतीतील लोक टेरेसवर गेले. अशा 10 जणांची जवानांनी सुटका केली आहे. ही आग सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास लागली. आता आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे.
प्रभात चित्रपटगृहासमोरील गल्लीत जोशी संकुल ही सात मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये औषधी साहित्याचे गोदाम करण्यात आले होते. या गोदामात सकाळी पावणे नऊ वाजता आग लागली़ गोदाम बंद असल्याने आतून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. त्यामुळे आजूला राहणाऱ्या लोकांचा त्याचा त्रास होऊ लागला. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
जवानांनी बी ए सेट घालून टेरेसवरील लोकांना खाली घेतले. तसेच धुरात अडकलेल्या लोकांची त्यांनी सुटका केली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी विजय भिलारे आणि राजेश जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणून इमारतीतील 26 जणांची सुटका केली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पुण्यात साडी सेंटरला भीषण आग, 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
देवाची ऊरळी येथील सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपोच्या दुकानाला काही दिवसांपूर्वी पहाटे आग लागली होती. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. तसेच सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले होते. राकेश रियाड (वय २२),धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३),रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे होती. सुमारे सात हजार स्केअर फुटच्या या दुकानात साडी व रेडीमेड कपड्याचे दालन होते. चार राजस्थानचे तर एक लातूरचा कामगार राहण्याची सोय नसल्याने या दुकानातच आतमध्ये राहत होते. चोरी होऊ नये या उद्देशाने दुकानाला बाहेरून कुलूप लावण्यात येत असे. आतमध्ये पाच कामगार झोपले होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याने या पाच कामगारांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा आगीत गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला.