ऐतिहासिक शिवाजी मार्केटला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:57+5:302021-03-17T04:10:57+5:30
पुणे महापालिकेच्या तीन फायर इंजिन, पुणे कॅन्टोन्मेंटच्या दोन गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर एवढ्या सर्वांनी ही आग आटोक्यात आणली. ...
पुणे महापालिकेच्या तीन फायर इंजिन, पुणे कॅन्टोन्मेंटच्या दोन गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर एवढ्या सर्वांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत मार्केटचा छत संपूर्ण जळून गेला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चारबावडी पोलीस चौकीत या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी मार्केट जवळपास २ एकर परिसरात आहे. त्यात एकूण ५३० ते ६०० व्यापारी व्यवसाय करतात. आगीत दीड हजार चौरस फूट जागेतील फिश मार्केट जळून गेले आहे.
मार्केटचे फायर ऑडिट प्रत्येक वर्षी केले जात असल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रकाश हसबे यांनी सांगितले. नुकतेच कँन्टोन्मेंटच्या पटेल रुग्णालयात दोनदा आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर या वर्षातील ही तिसरी घटना आहे.
महसूल अधीक्षक गिरीश साबळे म्हणाले,‘‘फिश मार्केटकडून बोर्डाला वर्षापोटी महसूल म्हणून ४ लाख रुपये मिळतात. त्याबदल्यात आम्ही त्यांना पाणी, स्वच्छता आदी सुविधा पुरवितो.’’
-------------------
मलबा काढावा, आम्ही पुन्हा व्यवसाय करू
आशिष परदेशी मासे विक्रेते म्हणाले की, आम्ही ४० वर्षांपासून येथे व्यवसाय करतो, बोर्डाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, याची आम्हाला जाण आहे. बोर्डाने त्वरित आगीचा मलबा काढून द्यावा, जेणेकरून आम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकतो.’’
------
एक वर्षभरापूर्वी कॅन्टोन्मेंटने येथील वीजपुरवठा बंद केला असून, सध्या येथील व्यावसायिक स्वतःच्या मीटरवर वीज वापरात आहेत. येथे असलेल्या शीतगृह किंवा फ्रिजचा स्फोट झाल्याने ही आग लागली असावी.
- विजय चव्हाण, मुख्य विद्युत अभियंता
----------