पुण्यात वडकी येथील तेलाच्या गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 06:34 PM2021-05-16T18:34:28+5:302021-05-16T18:34:35+5:30
१८ तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल
पुणे: सासवड रस्त्यावरील वडकी गाव येथील खाद्यतेलाच्या गोदामाला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या गोदामात खादयतेल, तूप, मेडिसिन, केबल वायर, पेपर्स याचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याने आगीने भीषण स्वरुप धारण केले होते. सासवड रोडवरील वडकी गाव येथील गोदामात फॉर्च्युन ऑइल, इप्का लॅबोरेटरी ॲन्ड एम्बेसी प्रॉडक्ट, एम्वे आणि पेपर बूट या कंपन्यांचा माल होता.
शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच पीएमआरडीएक अग्निशमन दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. त्यांच्या मदतीला पुणे महापालिकेचे बंब पोहचले होते. रात्रीची वेळ, पाण्याची कमतरता व शेडला व्हेंटिलेशन नसल्याने आग विझवण्यात अडथळा येत होता. आग अत्यंत भीषण स्वरुपाची होती. आत मोठ्या प्रमाणावर खादय तेल, तूप, केबल वायर, पेपर्स, मेडिसिन यांचा साठा असल्याने आग सातत्याने भडकत होती.
पीएमआरडीए अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, विजय महाजन व त्यांचे सहकारी, ५० जवानांनी तब्बल १८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. या आगीत किमान ५० ते ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. कुलिंगचे काम दुपारपर्यंत सुरु होते.