मास्टर कृष्णराव पुरस्कार मिळणे ही शाबासकी
By admin | Published: January 22, 2016 12:52 AM2016-01-22T00:52:05+5:302016-01-22T00:52:05+5:30
मुजुमदार वाड्यात रंगत असलेले मास्टर कृष्णराव यांचे गाणे... सरदार मुजुमदार आणि मास्टर कृष्णराव यांचे जुळलेले ॠणानुबंध.
पुणे : मुजुमदार वाड्यात रंगत असलेले मास्टर कृष्णराव यांचे गाणे... सरदार मुजुमदार आणि मास्टर कृष्णराव यांचे जुळलेले ॠणानुबंध... अशा दोघांच्या भावविश्वाच्या आठवणींचा एकेक कप्पा उलगडत सरदार मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांनी ‘मास्टर कृष्णराव यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी शाबासकी आहे,’ अशी भावना व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार’ परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते मुजुमदार यांच्या ‘स्वरसंगत सरदार’ या ग्रंथासाठी फुलंब्रीकर यांच्या घरी छोटेखानी कार्यक्रमात बुधवारी देण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, अॅड. प्रमोद आडकर, योगेश सोमण, सुनीताराजे पवार, रवींद्र जोशी, संजय देशपांडे, मास्टर फुलंब्रीकर यांच्या स्नुषा कुंदा फुलंब्रीकर, डॉ. वसुंधरा फुलंब्रीकर, प्रिया फुलंब्रीकर व फुलंब्रीकर कुटुंबीय या प्रसंगी उपस्थित होते.
उत्तरार्धात संजय देशपांडे यांचे हार्मोनियम वादन रंगले. मास्टर कृष्णराव यांनी बांधलेल्या बंदिशी, भजने त्यांनी सादर केली. (प्रतिनिधी)मुजुमदार वाड्यात मास्टर कृष्णराव गणेशोत्सवात संगीत सेवेसाठी येत असत. सरदार मुजुमदारांची परिस्थिती खालावली होती, तेव्हा विलायत खाँसाहेबांचे गायन वाड्यात रंगले होते. त्यांनी काही बिदागी स्वीकारली नाही. बांधून ठेवणारी माणसे त्या काळी होती. मास्टर कृष्णराव त्यांपैकीच एक होते. सरदार किबेंच्या ३६ हजार चिजा संकलित केल्या असून, संशोधनात्मक लेख या पुस्तकात आहेत.