टेबल टेनिसच्या खेळात दृष्टीहीन व्यक्तींचा ‘मास्टर स्ट्रोक’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 07:00 AM2019-08-25T07:00:00+5:302019-08-25T07:00:10+5:30

‘टेबल टेनिस’ हा  खेळ फक्त दृष्टी असलेलेच व्यक्ती खेळू शकतात, अशी एक सर्वसाधारण धारणा आहे.

'Master stroke' by blind person on table tennis court | टेबल टेनिसच्या खेळात दृष्टीहीन व्यक्तींचा ‘मास्टर स्ट्रोक’

टेबल टेनिसच्या खेळात दृष्टीहीन व्यक्तींचा ‘मास्टर स्ट्रोक’

Next
ठळक मुद्दे ’लव्ह ऑल स्पोर्टस फौंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार

नम्रता फडणीस- 
पुणे : ‘टेबल टेनिस’ हा एक प्रचलित खेळ ! तो कसा खेळला जातो हे ब-यापैकी सगळ्यांनाच अवगत आहे. विचार करा? हाच खेळ दृष्टीहीन व्यक्ती देखील खेळू शकतात. असं  म्हटलं तर?  कदाचित विश्वास बसणार नाही.  पण आळंदी येथील जागृती स्कूलच्या दृष्टीहीन मुलींना या खेळाचं प्रशिक्षण दिलं जातयं. ’लव्ह ऑल स्पोर्टस फौंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने हे शिवधनुष्य पेलले असून, लवकरच या दृष्टीहीन मुलींना टेबल टेनिस स्पर्धेत उतरविण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. 
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टेबल टेनिसपटू भूषण ठाकूर आणि त्यांची पत्नी आरती ठाकूर यांनी दृष्टीहीन मुलींना या खेळामध्ये प्रशिक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  देशात दृष्टीहीन व्यक्तींचा  ‘क्रिकेट’ खेळ यापूर्वीच लोकप्रिय झाला आहे. देशविदेशात व्हिलचेअरच्या माध्यमातून बास्केटबॉल खेळण्याचा प्रयोग देखील नवीन नाही. यात आता भर पडणार आहे, ती दृष्टीहीन व्यक्तींच्या टेबल टेनिसची. ‘लव्ह ऑल स्पोर्टस फौंडेशन’  ही संस्था विशेष मुलांच्या शाळांमध्ये खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करते. हा या उपक्रमाचाच एक भाग आहे. या अभिनव प्रयोगाविषयी  ‘लोकमत’ने आरती ठाकूर यांच्याशी संवाद साधला. 


त्या म्हणाल्या, आमच्या रोटरी क्लबचा एक कार्यक्रम आळंदीच्या जागृती स्कूलमध्ये झाला होता. त्यावेळी कुणाला टेबल टेनिस खेळायला आवडेल? असा प्रश्न आम्ही विचारला आणि जवळपास 40 मुलींनी हात वर केले. तेव्हा या मुलींना टेबल टेनिसमध्ये प्रशिक्षित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण पूर्वी असा प्रयोग कधी झालेला नसल्यानं दृष्टीहीनांना प्रशिक्षण कसं द्यायचं याची आम्हाला  काहीचं कल्पना नव्हती.  तरीही हे आव्हानं आम्ही पेललं. हा खेळ खेळताना त्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा पहिल्यांदा आम्ही अभ्यास केला. टेबलावर बॉलचा टप्पा पडून तो बँटने प्रतिस्पर्धीकडे भिरकावणं. ही या खेळाची पद्धत आहे. पण मग दृष्टीहिन व्यक्तींच्या हातात तो बॉल सहजरित्या येणार कसा? यासाठी त्यांच्याकरिता एक स्पेशल बॉल तयार करणं गरजेचं होतं. ज्यायोगे त्या बॉलमध्ये टाकण्यात आलेल्या विशिष्ट वस्तूंच्या आवाजाद्वारे दृष्टीहीन मुलींना बॉलचे अचूक स्थान कळू शकेल. मात्र अडचण ही होती की टेबल टेनिसचे बॉल हे वजनाने हलके असतात. त्यात जर काहीशा जड वस्तू टाकल्या तर त्याचा टप्पा योग्य रितीने पडणार नाही. यासाठी बॉलमध्ये कोणत्या वस्तू वापरता येऊ शकतील याचे अनेक प्रयोग केले. शेवटी हलक्या वजनाचे मोती बॉलमध्ये टाकण्याचं निश्चित केलं. मात्र या पुढची अजून एक अवघड गोष्ट होती ती म्हणजे टेबल टेनिस चे प्रशिक्षण देण्याची. अचूक वेळेत त्यांना स्ट्रोक मारता यायला हवा. बॉल कुठल्या दिशेने येत आहे ते स्थान आवाजाद्वारे ऐकून त्याला त्यांनी प्रतिसाद देणं ही म्हणावी तितकी सोपी गोष्ट नव्हती. पण दृष्टीहीन मुलींमधील कौशल्य आणि आकलन क्षमता पाहून आम्ही अवाक झालो. त्यांनी झटकन ही संकल्पना समजावून घेतली. मात्र टेबलावरून जमिनीवर पडलेला बॉल शोधण्यात त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी आम्ही एका बाजूला बॉलमध्ये दोरी बांधली आणि त्याचे टोक मुलींच्या हातात दिले. ज्यायोगे त्या सहजपणे दोरी खेचून बॉल हातात घेऊ शकतील. हा खेळ मुलींना आवडायला लागला असून, एकप्रकारे खेळानं त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे.
आगामी काळात या दृष्टीहीन मुलींना स्पर्धेत उतरविण्याचा आमचा मानस असून,स्पर्धेतील त्यांचा खेळ पाहिल्यानंतर  खेळात सुधारणा करण्यावर भर दिला जाईल असेही त्या म्हणाल्या.
---------
आम्हाला हा खेळ खेळण्याची इच्छा आहे...
  ‘टेबल टेनिस’ हा  खेळ फक्त दृष्टी असलेलेच व्यक्ती खेळू शकतात, अशी एक सर्वसाधारण धारणा आहे. मात्र आम्हीही हा खेळ खेळू शकतो यातून आमचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला आहे. ‘आम्हाला हा खेळ खेळताना खूप मजा येत आहे. हा खेळ चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. पण आम्ही त्यात नक्की यशस्वी होऊ असा विश्वास जागृती शाळेतील दृष्टीहीन मुलींनी व्यक्त केला.

Web Title: 'Master stroke' by blind person on table tennis court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.