कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील मुख्य सूत्रधार ३ वर्षांनंतरही मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:00+5:302021-08-12T04:14:00+5:30
विवेक भुसे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर भारतातील सर्वात मोठा सायबर हल्ला करुन तब्बल ९४ कोटी ...
विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर भारतातील सर्वात मोठा सायबर हल्ला करुन तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटणारे आंतरराष्ट्रीय हॅकरपर्यंत पोहोचण्यात अजूनही यश आले नसून २८ देशांतील सरकारांचे सहकार्य न मिळाल्याने तीन वर्षांनंतरही हे सायबर चोरटे मोकाट आहेत. त्याच वेळी भारतातील रुपे कार्डवरून अडीच कोटी रुपये काढण्यात मुख्य सहभाग असलेल्या सुमेर शेखला संयुक्त अरब अमिराती (यूएई) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर ११ ऑगस्ट रोजी हल्ला करुन जगभरातील २८ देशांमधून ७८ कोटी रुपये काढले गेले. केवळ २ तास १२ मिनिटांत जगभरातील विविध एटीएम सेंटरमधून १२ हजारांहून अधिक व्यवहार करुन हे पैसे काढले गेले होते. देशातील हा सर्वात मोठा सायबर हल्ला होता. यामुळे संपूर्ण देशासह परदेशातही खळबळ उडाली होती. त्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास करताना सर्वाधिक व्यवहार झालेल्या कोल्हापूर शहरावर लक्ष केंद्रित करुन प्रत्यक्ष एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे काढणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. मात्र, साखळीतील हे सर्वात शेवटचे घटक होते. काही पैशांच्या मोबदल्यात त्यांनी पैसे काढून देण्याचे काम केले होते.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. त्यापैकी एका जणाचा मृत्यू झाला असून, एकाला जामीन मिळाला आहे. अन्य १६ जण अजूनही येरवडा कारागृहात आहेत. पोलिसांनी जवळपास साडेपाच लाख रुपयांचे १७ मोबाईल, हार्ड डिस्क व अन्य साहित्य जप्त केले आहे.
५ म्होरके निष्पन्न
भारतात रुपे कार्डमार्फत झालेल्या सायबर चोरीचा तपास पोलिसांनी जवळपास पूर्ण केला आहे. त्यात दुबईस्थित सुमेर शेख हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने ज्यांच्यामार्फत हा सर्व प्रकार घडवून आणला, ते ५ प्रमुख म्होरके पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघे जण फरार आहेत.
असा केला हल्ला
आंतरराष्ट्रीय हॅकरने अगोदर कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांचा डाटा चोरला होता. तो त्यांनी आपल्या वेगवेगळ्या एजंटामार्फत सर्वांना पाठविला होता. सुमेर यानेही भारतातील आपल्या एजंटांना हा डाटा पाठवून त्याद्वारे त्यांनी सुमारे ४०० बनावट रुपे कार्ड तयार करुन घेतली होती. त्यानंतर त्यांनी कोणकोणत्या शहरातून कधी पैसे काढायचे याची सर्व माहिती या एजंटांना दिली होती. त्यानुसार हे एजंट त्यांच्या भाडोत्री हस्तकांना घेऊन त्या त्या शहरात अगोदरच गेले होते. त्यानंतर प्रत्यक्ष पैसे काढण्याच्या दिवशी म्हणजे ११ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी सुमेर शेख यांनी या सर्वांना वेळ सांगून पासवर्ड कळविला होता. त्यानंतर या एजंटांनी त्यांच्या भाडोत्री हस्तकांमार्फत वेगवेगळ्या शहरांतून त्यांना अगोदर दिलेल्या कार्डचा वापर करून एकापाठोपाठ एक व्यवहार करुन पैसे काढण्यास सुरुवात केली. हे पैसे त्यांनी एजंटला देऊन त्यापोटी त्यांना काही हजार रुपये कमिशन देण्यात आले होते. पुणे पोलिसांनी हा सर्व कट कसा रचला व कशा पद्धतीने त्यांची कार्यवाही करण्यात आली, हे तपासात निष्पन्न केले.
भारताच्या केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत ज्या २८ देशांतून पैसे काढले गेले, त्या सर्वांना ही माहिती देऊन तपास करुन संशयितांना अटक करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. सुरुवातीला या देशांनी सहकार्यांचे आश्वासन दिले. परंतु, प्रत्यक्षात कोणत्याही देशाने प्रत्यक्ष हा सर्व प्रकार कोणी घडवून आणला. त्या हॅकर्सचा शोध लावण्याच्या प्रयत्न केला गेला नाही. त्यामुळे भारतातील सायबर चोरीचा तपास करण्यात आला असला तरी त्यातून जे अडीच कोटी रुपये काढण्यात आले. त्यापैकी अगदीच काही हजारांची रक्कम जप्त केली गेली. तसेच त्यातून भारतातील सायबर चोरीच्या मुख्य सूत्रधाराला भारतात आणण्यात यश आलेले नाही. परदेशात तपास करणे येथील सायबर पोलिसांना शक्य नसल्याने मुख्य आंतराष्ट्रीय हॅकर्सपर्यंत पोहोचणे शक्य नाही़ या घटनेला ३ वर्षे झाल्याने हे हॅकर्स आता हाती लागणेही अवघड वाटत आहेत.