कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील मुख्य सूत्रधार ३ वर्षांनंतरही मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 07:57 IST2021-08-11T07:55:39+5:302021-08-11T07:57:28+5:30
भारतातील मास्टरमाईंड जाळ्यात; आंतरराष्ट्रीय हॅकर अजूनही गुलदस्त्यात

कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील मुख्य सूत्रधार ३ वर्षांनंतरही मोकाट
- विवेक भुसे
पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर भारतातील सर्वांत मोठा सायबर हल्ला करून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॅकरपर्यंत पोहोचण्यात अजूनही यश आलेले नाही. २८ देशांतील सरकारचे सहकार्य न मिळाल्याने तीन वर्षांनंतरही हे सायबर चोरटे मोकाट आहेत. त्याच वेळी भारतातील रुपे कार्डवरून अडीच कोटी रुपये काढण्यात मुख्य सहभाग असलेल्या सुमेर शेखला संयुक्त अरब अमिरात (यूएई) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर ११ ऑगस्ट २०१८ रोजी हल्ला करून जगभरातील २८ देशांमधून ७८ कोटी रुपये काढले गेले. केवळ २ तास १२ मिनिटांत जगभरातील विविध एटीएम सेंटरमधून १२ हजारांहून अधिक व्यवहार करून हे पैसे काढले गेले होते. देशातील हा सर्वांत मोठा सायबर हल्ला होता. तपासासाठी पुणे पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांच्या पथकाने तपास करताना सर्वाधिक व्यवहार झालेल्या कोल्हापूर शहरावर लक्ष केंद्रित करून प्रत्यक्ष एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे काढणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. साखळीतील हे सर्वांत शेवटचे घटक होते. काही पैशांच्या मोबदल्यात त्यांनी पैसे काढून देण्याचे काम केले होते.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात १८ जणांना अटक केली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एकाला जामीन मिळाला आहे. अन्य १६ जण अजूनही येरवडा कारागृहात आहेत. पोलिसांनी जवळपास साडेपाच लाख रुपयांचे १७ मोबाईल, हार्ड डिस्क व अन्य साहित्य जप्त केले आहे.
पाच म्होरके असल्याचे निष्पन्न
भारतात रुपे कार्डमार्फत झालेल्या सायबर चोरीचा तपास पोलिसांनी जवळपास पूर्ण केला आहे. त्यात दुबईस्थित सुमेर शेख हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने ज्यांच्यामार्फत हा सर्व प्रकार घडवून आणला, ते ५ प्रमुख म्होरके पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघे जण फरार आहेत.