डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 08:47 PM2018-08-19T20:47:10+5:302018-08-19T20:47:10+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे विरेंद्र तावडेच मास्टरमाईंड असल्याची माहिती सीबीआयमधील सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून सचिन अंदुरे यास अटक केली
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातनचा विरेंद्र तावडेच मास्टरमाईंड असल्याची माहिती सीबीआयमधील सुत्रांनी दिली. याप्रकरणी सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून सचिन अंदुरे यास अटक केली आहे. त्यानंतर, आज सचिनला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सचिनला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
विरेंद्र तावडेच्या मदतीनेच सचिन अंदुरेने डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा कट रचला होता. सीबीआयने सचिन अंदुरेला शुक्रवारी दाभोलकरांचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर, आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात त्यास हजर करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीमध्ये सचिनचे नाव समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने सचिनला औरंगाबादमधून ताब्यात घेतले होते. आरोपीला कुठलाही पुरावा नसताना अटक केल्याचे सचिनचे वकील प्रशांत सलसिंगीकर यांनी कोर्टात म्हटले आहे. मात्र, सचिनच्या तपासात विरेंद्र तावडेच या खूनामागील मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयमधील सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, लोकमतनेही 14 जून 2016 रोजी हे वृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीच्या आधारे दिले होते.
मुख्य सूत्रधार वीरेंद्रसिंग तावडे
सीबीआयने संशयावरुन सनातनच्या डॉ. वीरेंद्रसिंग तावडेला यापूर्वीच अटक केली आहे. तावडे हाच डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असून तसे पुरावे सीबीआय गोळा करीत असल्याचे तपास अधिकारी एस. आर. सिंग यापूर्वीच सांगितले होते. त्यानंतर, आज पुन्हा सचिन अंदुरेच्या चौकशीतही तावडेचं नाव समोर आल्याची सुत्रांची माहिती आहे. तावडेला अटक करण्यापूर्वी एक महिन्यापासून त्याच्यावर ‘वॉच’ ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर 1 जूनला त्याच्या पनवेल येथील घरामध्ये झडती घेतल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याच्याबाबत संशय बळावल्यामुळे त्यास अटक करण्यात आल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग आकोलकर याच्यासोबत तावडेचा ईमेलद्वारे संपर्क असल्याचे तपासात पुढे आले आहे. तीन ते चार ईमेल्समध्ये संशयास्पद मजकूर होता. तावडेच्या पनवेलमधील घरामध्ये झडती घेतल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमधूनही काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. 2004 मध्ये कोल्हापुरात झालेल्या दाभोलकरांच्या कार्यक्रमात तावडेने त्यांच्याशी जाहीर वाद घातला होता.
तावडेला काढायचा होता शस्त्रांचा कारखाना
200पेक्षा अधिक ई-मेल्सद्वारे अकोलकर आणि तावडेमध्ये संपर्क झाला आहे. या दोघांनी मध्य प्रदेशामधून बेकायदा शस्त्र खरेदी करण्यासंदर्भात अनेकदा चर्चा केली असून गावठी कट्टे आणि विदेशी अग्निशस्त्र विकत घेण्याबाबत विचारविनिमयही केल्याचे समोर आले आहे. शस्त्र निर्मितीसाठी छोटासा कारखाना टाकण्यासंदर्भात त्यांचे काही नियोजन होते का, याबाबत सीबीआयकडून तपास करण्यात येत आहे.
‘टीम तावडे’चे लक्ष्य
डॉ. नरेंद्र दाभोळकरच नव्हते, तर महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांना ते संपविणार होते. हिंदू राष्ट्र स्थापण्यासाठी 15 हजार जणांचे लष्कर उभारण्याचीही त्यांची योजना होती.