पंतप्रधानांसमोर मांडणार मातंग समाजाचे प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:28+5:302021-01-25T04:12:28+5:30
पुणे : मातंग समाजाचे जे प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात त्या प्रश्नांबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल. तसेच, समाजाचे ...
पुणे : मातंग समाजाचे जे प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात त्या प्रश्नांबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल. तसेच, समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आरक्षण आणि लो. अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न देण्याबाबत असलेले प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समाजाच्या नेत्यांसह भेट घेणार असल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. मातंग समाज राज्यव्यापी परिषदेमध्ये ते बोलत होते.
परिषदेच्या अध्यक्षपदी मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे होते. माजी आमदार राम गुंडीले, प्रा. सुकुमार कांबळे, दिलीप आगळे, प्रा. मिलिंद आव्हाड, रवींद्र दळवी, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक सुभाष जगताप, अविनाश बागवे, विजय डाकले, मनोज कांबळे, शिवसेना नेते बाळासाहेब भांडे, अनिल हातागळे, आण्णा वायदंडे, आनंद वैराट उपस्थित होते.
गुंडीले म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ सहा वर्षे बंद आहे. समाजातील तरुण बेरोजगार झाले तर ते गुन्हेगारीकडे वळतील. समाजाला न्याय न मिळाल्यास येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढविल्या जातील, असे प्रा. कांबळे म्हणाले. तर, दळवी यांनी मातंग विकास विभाग वेगळा करावा, अशी मागणी केली. आगळे यांनी आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली.
अध्यक्षीय भाषणात हनुमंत साठे म्हणाले, की मातंग समाजाला आज स्वतंत्र आरक्षण, समाजकल्याणमध्ये मातंग विकास विभाग वेगळा करावा, मातंग आयोगाच्या शिफारशी तसेच महामंडळ या गोष्टी समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असून त्या आपण सोडवाव्या, अशी मागणी आठवले यांच्याकडे केली.