कपड्यांवर मॅचिंग मास्क हवाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:09 AM2021-07-20T04:09:55+5:302021-07-20T04:09:55+5:30
महिलांमध्ये रंगेबिरंगी डिझाइन पैठणीपासून बनविलेले ‘मास्क’ महिलांमध्ये रंगेबिरंगी डिझाईन पैठणीपासून बनविलेले ‘मास्क’ सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. ...
महिलांमध्ये रंगेबिरंगी डिझाइन पैठणीपासून बनविलेले ‘मास्क’ महिलांमध्ये रंगेबिरंगी डिझाईन पैठणीपासून बनविलेले ‘मास्क’ सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. स्वत:ची एखादी पैठणी डिझायनरकडे घेऊन जात त्याच्यापासून मास्क बनवून घेण्याकडे कल वाढला आहे. एखादी ओढणी जुनी झाली असेल तर ती टाकून देण्यापेक्षा त्याचा मास्क करून घेण्यासदेखील पसंती दिली जात आहे. लग्नसोहळ्यातही वधू आणि वर कपड्यांची खरेदी करताना आधी मास्कचा विचार करीत आहेत. शालू आणि सद-याला मॅचिंग असे डिझाईन केलेले मास्क, त्याला मोती किंवा रिबिन, खडे अथवा मेकअपला सूट होईल असे मास्क निवडीला प्राधान्य दिले जात आहे. जोपर्यंत कोरोना आहे, तोपर्यंत मास्कच्या व्यवसायाला मरण नाही या भावनेतून अनेक गृहिणीदेखील मास्क निर्मितीकडे वळल्या आहेत. सध्याचा मास्कचा नवा ट्रेंड काय आहे? महिलांची आवड? या गोष्टी लक्षात घेऊन दोन लेअर, तीन लेअर असे मास्क तयार करून दिले जात आहेत. बहुतांश वेळेला लहान मुलांच्या मापाचे मास्क मिळत नाही, अशावेळी मुलांचे वय गृहीत धरून देखील प्लेन कापडाचे मास्क तयार करून कार्टून्स, बलून्सची चित्रे काढून खास मुलांच्या मास्कची विक्री केली जात आहे. अगदी फ्रेंडशीप डे, व्हॅलेंटाईन डे किंवा एखादा घरगुती समारंभ असेल तर गिफ्ट म्हणूनदेखील पारंपरिक खास खणाचे मास्क देण्यावर भर दिला जात आहे. घरच्या घरी मास्क कसा बनवायचा याची वर्कशॉप आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर टाकले जात आहेत.
पुरुषांसाठी खास जीन्स आणि आर्मी डिझाईनचे मास्क
बहुतांश वेळेला पुरुष घराबाहेर पडल्यानंतर बफचा वापर करीत असले तरी खास त्यांच्यासाठी जीन्स आणि आर्मी डिझाईनचे मास्क देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पूर्वी लग्न समारंभ किंवा कार्यक्रमात आलेल्या नागरिकांना टॉवेल आणि टोपी देण्याची प्रथा आहे. त्यात आता ‘मास्क’ची भर पडली आहे.
‘मास्क’मध्ये केलं जातंय सेलिब्रेटींचे अनुकरण
सेलिब्रिटींचे मास्क हा देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. तरुणाई सेलिब्रिटींना सोशल मीडियावर फॉलो करीत असल्याने त्यांच्यासारखाच मास्क मिळविण्यासाठी दुकानांचे उंबरठे देखील झिजवले जात आहेत. अगदी तसा मास्क मिळाल्यानंतर मग त्या सेलिब्रिटीसह स्वत:चा सेल्फी टाकण्याचाही मोह आवरता येत नाही. यापुढील काळात ‘मास्क’च्या फॅशन जगतात अजून नवीन ट्रेंड आले नाहीत तरच नवल!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------