साहित्य पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:50+5:302021-07-26T04:09:50+5:30
पुणे : "झाडाची मुळे जमिनीत खोलवर पसरून पाणी शोषून घेतात, तशी अनुभवाची पाळेमुळे खोलवर रुजावीत. या जाणिवेतून लिहिलेले साहित्य ...
पुणे : "झाडाची मुळे जमिनीत खोलवर पसरून पाणी शोषून घेतात, तशी अनुभवाची पाळेमुळे खोलवर रुजावीत. या जाणिवेतून लिहिलेले साहित्य पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देत असते. कवीच्या जाणिवा भक्कम असाव्यात. विश्व जागवण्याचे आणि वास्तवाला मांडण्याचे गीत कवीच्या अंत:करणातून प्रकट व्हायला हवे," असे मत साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
प्रा. अशोककुमार पगारिया लिखित, वेदांत प्रकाशन प्रकाशित 'कथा कोरोनाची, लढा कोरोनाशी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. देखणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे तसेच साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवडचे शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, कवी चंद्रकांत वानखेडे, डॉ. ललित धोका, वेदांत प्रकाशनचे सुनील गायकवाड, सचिन बेदमुथा, रुचिरा सुराणा, प्रा. प्रकाश कटारिया, विजय पारख, नितीन चोपडा, राजेंद्र धोका, प्रकाश पगारिया, भवरीलालजी खिंवसरा, अभय बोथरा, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. देखणे म्हणाले, “डॉ. पगारिया यांनी कोरोनाचे वास्तव कवितेत मांडले आहे. त्यांच्या कविता वास्तवाशी, सामाजिक जाणिवांशी जोडल्या आहेत. गेल्या दीड वर्षातील सामाजिक जीवनाचे भावदर्शन त्यांनी घडवले आहे." राजन लाखे म्हणाले “वेदना आणि प्रतिभा यांचा अविष्कार असलेल्या या कविता आहेत. पगारिया यांनी कोरोनाबाधित कुटुंबियांच्या अनुभवातुन सकारात्मक दृष्टीकोन घेत कविता लिहिल्या आहेत. त्यांना झालेल्या वेदना आणि त्यांची प्रतिभा यांमधून कविता साकारल्या आहेत."
सुनील गायकवाड यांनी प्रास्तविक केले. विलासकुमार पगारिया यांनी आभार मानले.