मातृत्वाचा सन्मान गरजेचा
By admin | Published: January 13, 2017 03:31 AM2017-01-13T03:31:45+5:302017-01-13T03:31:45+5:30
समाजात स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार अशा घटना वारंवार घडत असताना मातृत्वाचा सन्मान ही अत्यंत गरजेची
पुणे : ‘समाजात स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार अशा घटना वारंवार घडत असताना मातृत्वाचा सन्मान ही अत्यंत गरजेची बाब बनली आहे. बऱ्याच मराठी कादंबऱ्यांमध्ये प्रणय, चुंबनाची बटबटीत वर्णने वाचायला मिळतात. सूचक आणि सभ्य वर्णन दुर्मिळ होत चालले आहे. मराठी साहित्यामध्ये मोजक्या लेखकांनी नायकप्रधान आणि नायिकाप्रधान कादंबरी ही संकल्पना मोडून काढली आहे’, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
दिलीप बर्वे लिखित ‘विधिलिखित’ या कादंबरीचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे आणि डॉ. मधुसूदन घाणेकर उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘जीवन जगताना आलेले अनुभव, भोगलेली वेदना हे कलाकृतींच्या निर्मितीचे मूळ असते. विधिलिखित विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाही. ही संकल्पना बुद्धिप्रामाण्यवाद्यांना पटणारी नाही. मात्र, वेदना आणि विधिलिखिताचा जवळचा संबंध असतो. या अनुबंधातून लेखन उमटत जाते. यामागील कारणमीमांसा करणे शक्य नसते. ज्या क्षणी, लेखन स्फुरते, त्यामागे माणसाचे भोगलेपण लपलेले असते. इतरांचे दु:ख कळणे आणि स्वत: भोगणे यातून नवनिर्मितीची प्रतिभा जागृत होते. त्यातून कथानक साकारत जाते.’
डॉ. घाणेकर म्हणाले, ‘कोणत्याही क्षेत्रातील कलावंताचा व्यासंग निर्माण होणे गरजेचे असते. त्यातूनच कला वृद्धिंगत होते. कथा, कादंबरीतील पात्रे मार्मिकपणे रंगवणे हे लेखकाचे कौशल्य असते.’ डॉ. मृणाल धोंगडे यांनी सूत्रसंचालन केले. मोहित बर्वे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)