१० वी एसएससी पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी भरणार गणिताचा तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:27+5:302021-03-26T04:12:27+5:30
शनिवार दि. २७ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा वेळेवर सुरु होऊ ...
शनिवार दि. २७ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा वेळेवर सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणच घ्यावे लागले. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात समस्या निर्माण झाल्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला आहे. असे असले तरी दहावीच्या विद्यार्थ्यांचा गणित विषयाचा ताण हलका करण्यासाठी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर गणिताचा तास भरणार आहे.
परीक्षेत बहुतांशी विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती वाटते. या विषयाचा ताण विद्यार्थ्यांवर येतो. आता मात्र याची चिंता करण्याची गरज नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी गणिताचा नेमका कोणता अभ्यासक्रम कमी केला आहे? कोणते घटक कसे तयार करायचे? बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची, प्रमेयांची तयारी व बाहेरच्या प्रश्नांची तयारी कशी करायची? पाचव्या प्रश्नातील उपप्रश्न कोणत्या प्रकारचे असतील? पेपरच्या आदल्या दिवशी कसा व किती अभ्यास करायचा?
या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महेश ट्युटोरिअलसचे संचालक उमेश मुलगे आणि गणित अभ्यासमंडळाच्या सदस्या जयश्री अत्रे यांच्याकडून मिळणार आहे. ऑनलाईन भरणाऱ्या या तासात गणिताचा ताण हलका करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. यासाठी दहावीच्या विद्यार्थी व पालकांनी येत्या शनिवारी (दि. २७ मार्च) संध्याकाळी ५.३० वाजता फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर लॉगइन व्हावे.