अभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांचा वाद न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:43 AM2018-09-18T01:43:03+5:302018-09-18T01:43:36+5:30

प्राध्यापकांनी दिली कुलगुरूंना नोटीस; गोंधळ संपता संपेना

In the matter of courtesy appointments on the study boards | अभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांचा वाद न्यायालयात

अभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांचा वाद न्यायालयात

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विषयांच्या अभ्यास मंडळांवर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केलेल्या नियुक्त्या या बेकायदेशीर असल्याने त्याविरोधात प्राध्यापकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी कुलगुरू डॉ. करमळकर यांना सोमवारी वकिलांमार्फत नोटीस बजावली आहे.
महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (८) नुसार कला व वाणिज्य शाखेतील विविध विषयांच्या अभ्यास मंडळांवर प्रत्येकी ६ कुलगुरू नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. मात्र, त्या यादीमध्ये अनेक नियुक्त्या नियमबाह्य व बेकायदेशीरपणे झाल्याच्या तक्रारी प्राध्यापक, त्यांच्या संघटनांकडून करण्यात आला होता. या तक्रारींची दखल घेऊन अनेक विषयांच्या अभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांमध्ये बदल करून सुधारित यादी प्रसिद्ध करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. मात्र, अद्यापही काही नियुक्त्यांवरील प्राध्यापकांचे आक्षेप कायम आहेत. या पार्श्वभूमीवर तळेगाव ढमढेरे येथील डॉ. दत्तात्रय बावळे यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी रीतसर कुलगुरूंना नोटीस बजावली आहे.
अभ्यास मंडळांवर नियुक्त्या करण्यासाठी कुलगुरूंनी काही ठराविक प्राध्यापकांकडूनच अर्ज स्वीकारले; त्याचबरोबर त्यांच्याच मुलाखती घेण्यात आल्या. विशिष्ट लोकांच्याच मुलाखती कशाच्या आधारावर घेतल्या. रीतसर जाहिरात प्रसिद्ध करून सगळ्यांकडून अर्ज मागविले नाहीत, अशी मुख्य तक्रार प्राध्यापकांनी केली आहे. जर कुलगुरूंना त्यांचा विशेषाधिकार वापरून नियुक्ती करायची होती, तर मुलाखतींचा फार्स का केला, अशीही विचारणा त्यांनी केली आहे. या नियुक्तीमध्ये कुठलीही पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार ६ सदस्यांपैकी एक सदस्य हा विद्यापीठ विभागाच्या पूर्णवेळ अध्यापकांमधून निवडायचा आहे. त्यानंतर संबंधित विषयातील पदव्युत्तर अध्ययनक्रम देऊ करणाऱ्या सलंग्न महाविद्यालयांमधून किंवा पदव्युत्तर केंद्रांमधील मान्यताप्राप्त पदव्युत्तर अध्यापकांमधून दोन अध्यापक निवडायचे आहेत. उर्वरित ३ अध्यापक हे संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामधील विभागप्रमुख नसलेले निवडणे आवश्यक आहे. मात्र, अनेक विषयांच्या अभ्यास मंडळांवर या जागांवर विभागप्रमुख असलेलेच प्राध्यापक निवडण्यात आले आहेत.

अध्यक्षपदासाठी आज निवडणूक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांच्या अभ्यास मंडळ अध्यक्षपदासाठी मंगळवार, दि. १८ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर नियुक्त्यांचा वाद न्यायालयात गेल्याने त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण
झाले आहेत.

अभ्यास मंडळांवर निवडणुकीद्वारे निवडण्याच्या सदस्यांची निवड जानेवारी २०१८ मध्ये झाली. त्यानंतर ८ महिने उलटले तरी कुलगुरू नियुक्त सदस्य निवडण्यात न आल्याने अद्याप अभ्यास मंडळ कार्यान्वित होऊ शकलेले नाहीत. त्यात पुन्हा अभ्यास मंडळांच्या नियुक्त्यांचा घोळ झाला आहे.

तक्रारीची दखल न घेतल्याने नोटीस
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांवर झालेल्या नियमबाह्य नियुक्त्यांबाबत आॅगस्ट महिन्यातच विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने अखेर न्यायालयात जाण्याचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. याप्रकरणी सोमवारी अ‍ॅड. अभिजीत देवखिले यांच्यामार्फत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना नोटीस बजावली आहे.
-डॉ. दत्तात्रय बावळे

Web Title: In the matter of courtesy appointments on the study boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.