मावळातील जमीनमालकांची बोगसगिरीने उडाली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:38 AM2018-12-17T00:38:09+5:302018-12-17T00:38:29+5:30
परस्परविक्रीचे वाढले प्रकार : तालुक्यामध्ये २५ गुन्हे दाखल, खोटी कागदपत्रे बनविण्याचे प्रकार
विजय सुराणा
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जमिनीला सोन्याचे भाव आले असून, झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने बोगस कागदपत्रे बनवून जमीनमालकाला थांगपत्ता न लागता त्याची जमीन परस्पर विकायचा धंदा काही टोळ्यांनी अधिकारी व एजंटांना हाताशी धरून चालू केला आहे. यामुळे मूळ जमीनमालकांची झोप उडाली आहे. वर्षभरात याबाबत मावळ तालुक्यात २५ गुन्हे दाखल झाले आहेत.
तालुक्यात गेल्या दहा वर्षांत जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले असून, या जमिनी खरेदी करणारे काहीजण परराज्यांत व बाहेरगावी राहतात. काही जणांनी जमिनी घेतल्यानंतर त्यानी नावावर जमिनीची नोंदही केली नाही, तर काहींनी नोंद केली आहे; परंतु घेतलेल्या जमिनीकडे परत ढुंकूनही पाहिले नाही, अशा जमीनमालकांच्या जमिनी परस्पर विकून लाखो रुपये कमवून झटपट श्रीमंत होण्याच्या धंदा जोमाने सुरू झाला आहे. काही जमीनमालकांना आता जाग आली असून, आपल्या जमिनीचा ७/१२ उतारा पाहिल्यावर त्यावर दुसऱ्याचे नाव दिसून येत असल्याने त्यांची झोप उडाली. अनेक जमीनमालकांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेतली.
मावळ तालुक्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचीत असलेल्या लोणावळा-खंडाळा येथे जमिनीचे भाव इंचावर आहेत. या भागात काही मंत्री अभिनेते यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्या आहेत. यातील संगीतकार प्यारेलाल यांचीही फसवणूक झाली होती. पवना धरणालगत पवन, आंदर व नाणे मावळ अशा तिन्ही मावळसह तळेगाव व टाकवे औद्योगिक क्षेत्रात जमिनीला सोन्याचा दर आला आहे.या वर्षभरात बोगस जमीन खरेदीप्रकरणी वडगाव ठाण्यात ६, कामशेत येथे ४, लोणावळा ग्रामीण येथे ८, लोणावळा शहर ३, तर तळेगाव येथे ५ असे गुन्हे दाखल आहेत. वडगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी एस हाके यांनी एका महिन्यात चार गुन्हे दाखल करून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. येत्या काही दिवसांत दुय्यम निबंधक कार्यालयातील काही संबंधित अधिकारी व एजंटांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हाके यांनी दिली. याबाबत वडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक जे. डी. बडगुजर म्हणाले, की आतापर्यंत जी बोगस खरेदीखते झालीत, त्याची आम्हाला माहिती नव्हती. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यावर माहिती पडले.
खरेदीखत करताना मूळ ओळखपत्र, पॅन कार्ड,आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी पाहिले जाते.पॅन कार्ड आॅनलाइन तपासून घेतो.परंतु आम्ही सर्वच जमीनमालकांना ओळखत नाही. सध्या खरेदीखत करताना मूळ मालकाचे आधार कार्ड घेतल्याशिवाय आम्ही खरेदीखत करत नाही. पुढे कागदपत्रांच्या बाबतीत आम्हाला संशय आल्यास पोलिसांना कळवू. संबिधतांवर योग्य कारवाई केली.
दुय्यम निबंधक कार्यालयात टोळ्या सक्रिय
४मावळ तालुक्यात काही छोट्या-मोठ्या टोळ्या बोगस जमीन व्यवहार करण्यासाठी तसेच जमिनींचा ताबा मिळून देण्यासाठी सक्रिय झाल्या असून, बोगस खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील काही अधिकाºयांसह एजंट यामध्ये सामील झाले आहेत.बोगस खरेदीखत केल्यानंतर त्या जमिनीची नोंद करण्यासाठी संबंधित तलाठी व सर्कल यांना नोटांचे बंडल देऊन जमिनीची नोंद केली जाते. हा धंदा जोमात सुरू आहे. एका महिन्यापूर्वी पुण्याचे माजी आमदार नारायण श्रीपाद वैद्य यांची ११ गुंठ्यांचे खरेदीखत करण्याऐवजी १५३ गुठ्यांचे खरेदीखत केले. याप्रकरणी तीन जण अटक आहेत. नाणे मावळातील उकसान येथील एका शेतकºयाचे साठेखत करून घेण्याऐवजी खरेदीखत केले या प्रकरणी कामशेत पोलिसांनी चार जणांना अटक केली. तालुक्यात हा
धंदा राजरोसपणे चालू आहे. काहीजण गुंडगिरीच्या दहशतीने घाबरतात.