मौलाना आझाद यांचा उशिरा सन्मान झाला : फिरोझ बख्त अहमद; स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:49 PM2018-02-23T12:49:19+5:302018-02-23T12:53:00+5:30
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला तरीही, त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला ३० वर्षे लागली. हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला, अशी खंत पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केली.
पुणे : मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणक्षेत्राचा पाया रचला. तरीही, त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला ३० वर्षे लागली. हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला, अशी खंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भावाचे नातू, पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केली.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’आयोजित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. आबेदा इनामदार, लतिफ मगदूम उपस्थित होते. अभ्यासक सलीम चिश्ती, अनिता बेलापूरकर, मुमताझ सय्यद, रिझवाना शेख आदी उपस्थित होते.
बख्त म्हणाले, आझाद यांनीच भारतरत्न निवड समितीवर असल्याने त्याचा स्वीकार करणे अनुचित समजून हा पुरस्कार नाकारला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर ३० वर्षांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि कोलकात्याला त्यांच्या घरी पाठवून देण्यात आला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे पूर्ण नाव आणि उच्चार नीट लक्षात ठेवले जात नाहीत. त्यांच्यावरील लिखाण, त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्याची व्यवस्था जनतेला माहिती करण्यात हेळसांड झाली, अशी उदाहरणेही त्यांनी दिली.