मदरशातील मुलांचे लैंगिक शोषण करणा-या मौलानाला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 07:43 PM2018-07-28T19:43:18+5:302018-07-28T20:08:41+5:30
रात्रीच्या वेळी मौलाना तेथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याने त्याच्या या कृत्याला घाबरून १० वर्षांची दोन मुले २३ जुलै रोजी मदरशातून पळून पुणे स्टेशन येथे आली होती.
पुणे : कात्रजमधील जामीया अरबिया दारूल यतामा या मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी आलेल्या २ मुलांवर लैंगिक आत्याचार केल्याप्रकरणी तेथील मौलानाची ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हा घृणास्पद प्रकार उघड झाल्यानंतर सर्व मुलांना शिवाजीनगर येथील बालगृहात ठेवण्यात आले आहेत. मदरशामध्ये एकूण ३५ मुले होती. त्यातील किती मुलांवर मौलानाने अत्याचार केला याचा तपास पोलीस करत आहेत. पीडित चिमुरड्यांनी याबाबत एका संस्थेकडे वाच्यता केल्याने ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशीरा भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मौलाना रहीम (पूर्ण नाव व पत्ता नाही) असे अटक करण्यात आलेल्या मौलानाचे नाव आहे. बालहक्क कार्यकर्त्या डॉ. यामिनी अद्वैत अडबे (वय ५४) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. अटक करून रहीम याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मौलाना रहीम हा मदरशातील मुलांना धार्मिक शिक्षण देतो. रात्रीच्या वेळी तो तेथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करीत असल्याने त्याच्या या कृत्याला घाबरून १० वर्षांची दोन मुले २३ जुलै रोजी मदरशातून पळून पुणे स्टेशन येथे आली होती. स्टेशनवरील पोलिसांना ही मुले संशयास्पद रित्या फिरताना दिसून आली. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, मदरशातून पळून आल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे त्यांना साथी संस्थेकडे देण्यात आले होते. डॉ. यामिनी अडबे यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांची विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी दोन्ही मुलांवर मौलाना रहीम हा रात्रीच्या वेळी लैंगिक अत्याचार करत होता. त्याला विरोध केल्यास तो शिवीगाळ करून काठीने मारहाण करत. त्यामुळे घाबरून आम्ही पळून आला आहोत, असे त्यांनी सांगितले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर डॉ. अडबे यांनी त्वरीत पोलीस आयुक्तालयात रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशानुसार त्वरीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.