माऊली नामाच्या गजरात पावले स्थिरावली पुन्हा अलंकापुरी....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 08:55 PM2018-08-08T20:55:48+5:302018-08-08T21:04:15+5:30
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशीदिनी ‘श्रीं’ची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य झाला. मंदिरातील दर्शनबारीत रांगा लावून भाविकांनी गर्दी करीत ‘श्रीं’चे समाधी दर्शन घेतले.
आळंदी : माऊली...माऊलीचा जयघोष..टाळ-मृदंगांचा गजर...विणेचा त्रिनादासह भगव्या पताका नाचवत राज्य परिसरातून दाखल झालेल्या वैष्णव भाविकांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी ३३ दिवसांनी बुधवारी पुन्हा एकदा ज्ञानभक्तीत दुमदुमली. लाखावर भाविकांनी आषाढी एकादशीदिनी आपली भक्तिसेवा माऊलींच्या चरणी रुजू केली. ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याची सांगता पालखी नगरप्रदक्षिणा, हजेरी भजनाच्या कार्यक्रमांनी झाली.
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशीदिनी ‘श्रीं’ची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य झाला. मंदिरातील दर्शनबारीत रांगा लावून भाविकांनी गर्दी करीत ‘श्रीं’चे समाधी दर्शन घेतले. टाळ-मृदंगांचा गजर आणि माऊली नामाच्या जयघोषात माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेस दुपारी निघाली. ठिकठिकाणी भाविकांनी ‘श्रीं’च्या दर्शनास गर्दी केली. संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातदेखील भाविकांनी दर्शनास गर्दी केली.
रामघाटावरील दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दरम्यान, इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावर दर्शनबारी गेल्याने अपुऱ्या कमी पडत असलेल्या) दर्शनबारीने भाविकांना भक्ती सोपान पुलावरून ‘श्रीं’च्या दर्शनास यावे लागले. काळा मारुती दरवाजा, गणेश दरवाजा,पान दरवाजा येथून भाविकांना रहदारीला,महाद्वारातून भाविकांना बाहेर जाण्यास खुला ठेवण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.दरम्यान, आळंदी देवस्थानचे सेवक,सुरक्षारक्षक, आळंदी पोलीस यांनी दर्शन व्यवस्थेसह पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले.
हजेरी मारुती मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता परंपरेने हजेरी भजनासह नारळ प्रसाद देऊन झाली. येथे आळंदीकर ग्रामस्थांतर्फे श्रीधर कुऱ्हाडे परिवार, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील आणि डॉ.नाईक यांच्या वतीने आरिफ शेख परिवार यांनी नारळ प्रसाद दिला. पालखी सोहळा या आनंदोत्सव सोहळ्याची सांगता ‘श्रीं’चे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे यांच्या नियंत्रणात उत्साहात झाली.
दिंडीप्रमुख, मानकरी, चोपदार यांना आळंदी देवस्थानचे पदाधिकारी विश्वस्त अभय टिळक, विकास ढगे आदींनी माऊली मंदिरात ‘श्रीं’ची पालखी नगरप्रदक्षिणेनंतर परतल्यावर श्रीफळ दिले. मानकरी योगेश आरू,बाळासाहेब , मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर,‘श्रीं’चे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे आदींना नारळ प्रसाद देत सोहळ्यातील परंपरा कायम ठेवली.
सोहळ्याचे यशासाठी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, मालक बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब रणदिवे चोपदार, राजाभाऊ रंधवे, ह.भ.प.चक्रांकित महाराज, व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक आदींनी परिश्रम घेतले. समाधी मंदिराचा गाभारा, मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता.भाविकांनी पुष्प सजावटीचे स्वागत केले.
संत ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, संजय रणदिवे, श्रीकांत लवांडे, सोमनाथ लवंगे, ‘श्रीं’चे चोपदार बाळासाहेब रणदिवे यांनी भाविकांच्या दर्शनासाठी प्रभावी नियोजन केले. सुमारे लाखावर भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. आळंदी पोलीस, मंदिरातील सुरक्षारक्षक, सेवक-पोलीस यांनी बंदोबस्त ठेवला.
आळंदी संस्थानच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
नगरप्रदक्षिणा मार्गावर दुहेरी वाहतुकीने भाविकांत नाराजी
आळंदी परिसरातील रस्ते गर्दीने फुलले होते. शहरात वाहनांची गर्दी वाढल्याने नगरप्रदक्षिणा मार्गासह दोन्ही पुलांवरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवल्याने वाहतूककोंडीत वाढ झाली. माऊली मंदिरापर्यंत थेट वाहने आल्याने भाविकांची परिसरात गैरसोय झाली. एकेरी मार्गावर होणारी दुहेरी वाहतुकीची परंपरादेखील कायम राहिली; मात्र यात भाविक नागरिकांची नगरप्रदक्षिणा मार्गावर गैरसोय झाली.
............................
‘श्रीं’च्या दर्शनबारीचा प्रश्न ऐरणीवर
आळंदीत आषाढी एकादशीदिनी माऊली मंदिरात ‘श्रीं’चे दर्शन घेण्यास लाखावर भाविकांनी गर्दी केली. यावेळी मंदिरालगतची दर्शनबारी भरल्याने दर्शनबारी भक्ती सोपान पुलावर आली. यामुळे विकसित केलेली दर्शनबारी अपुरी पडत असल्याची बाब समोर आली.