लेकरांविना माऊली आजोळघरी मुक्कामी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 02:06 AM2020-06-14T02:06:56+5:302020-06-14T02:07:00+5:30
संत ज्ञानेश्वरांच्या आषाढीवारीचे प्रस्थान; दरवर्षीपेक्षा आगळावेगळा सोहळा
- भानुदास पºहाड
शेलपिंपळगाव (जि. पुणे): श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या १८९ व्या आषाढीवारी प्रस्थान सोहळ्यास शनिवारी पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तीच्या या छोटेखानी सोहळ्यात ना टाळाचा प्रचंड गजर झाला, ना पखवादाची थाप, ना फेर-फुगड्या, ना देहभान विसरून नाचणारे वारकरी. शासनाच्या नियमांचे पालन करत मोजक्याच वारकऱ्यांच्या समवेत सायंकाळी ४.३० वाजता माऊलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवले.
दरवर्षी लाखो लेकरांसह निघणारा पायी पालखी सोहळा कोरोनामुळे रद्द झाला आहे. परंतु परंपरेप्रमाणे प्रस्थान सोहळा पार पडला. सुरुवातीला प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती आणि महापूजा करण्यात आली. वीणामंडपात सकाळी दहानंतर वैष्णवमहाराज चोपदार यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी प्रस्थानाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.
ब्रह्मवृंदाच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. दरम्यान, शासनाने परवानगी दिलेल्या प्रस्थान संबंधित मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना पानदरवाज्यातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर मालकांनी शितोळे सरकारांना सन्मानपूर्वक मंदिरात आणले. माऊलींची आणि गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात सुपूर्द करून, चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले.
वीणामंडपातून चलपादुका बाहेर आणल्यानंतर, मंदिर आवारात मोजक्याच वारकऱ्यांच्या ‘ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या’ जयघोषात प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने परंपरेप्रमाणे पादुका लगतच्याच आजोळघरात (दर्शनमंडप) विराजमान करण्यात आल्या. त्याठिकाणी समाजआरती घेऊन पहिल्या दिवसाचा जागर करण्यात आला.