सजविलेल्या पालखीतून माऊलींची नगरप्रदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:38+5:302020-12-12T04:28:38+5:30

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशीनिमित्त मध्यरात्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर मर्यादित पुजाऱ्यांच्या ...

Mauli's city tour through decorated palanquin | सजविलेल्या पालखीतून माऊलींची नगरप्रदक्षिणा

सजविलेल्या पालखीतून माऊलींची नगरप्रदक्षिणा

Next

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशीनिमित्त मध्यरात्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर मर्यादित पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. तर दुपारी एकला नित्यनियमाप्रमाणे माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. तत्पूर्वी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात संचारबंदी लागू असल्याने इतिहासात प्रथमच कार्तिकी एकादशीच्या दिवशी मंदिर भाविकांविना सुने-सुने असल्याचे पाहायला मिळत आहे. आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला ८ डिसेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी परवानगी दिलेल्या श्री पांडुरंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह शुक्रवारी (दि.११) आळंदीत दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे - पाटील, सोहळा मालक बाळासाहेब पवार, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, सचिव अजित वडगावकर, व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते.

---------

रथोत्सवात भाविकांना सहभागी होता येणार नाही

पंढरीहून नामदेव महाराजांच्या दिंडीचे पादुकांसह आगमन झाले. त्यांनीही विधिवत नगरप्रदक्षिणा घातली. शनिवारी (दि.१२) दुपारी चार ते सात यावेळेत माऊलींचा रथोत्सव कार्यक्रम आहे. मात्र, यंदा हा रथ हाताने ओढण्यास बंदी असल्याने स्वयंचलित वाहनात प्रतिकात्मक स्वरूपात रथोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी ५० जणांच्या उपस्थितीतीला परवानगी आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी रथोत्सवात भाविकांना सहभागी होता येणार नाही.

-------

* पहाटे ४ ते ५ मान्यवरांच्या हस्ते पंचोपचार पूजा.

* पहाटे ३ ते ६ मुक्ताई मंडपात काकडा भजन.

* सायंकाळी ४ ते ७ रथोत्सव.

* सायंकाळी ४ ते ६ वीणा मंडपात कीर्तन.

* रात्री ९ ते ११ वीणा मंडपात केंदूरकरांचे किर्तन.

* रात्री ११ ते १२ खिरापत पूजा, प्रसाद वाटप.

--------------

१) तीर्थक्षेत्र अलंकापुरीत कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने माऊलींची सजविलेल्या पालखीतून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

२) महापूजेनंतर माऊलींचे दिसणारे साजिरे रूप.

Web Title: Mauli's city tour through decorated palanquin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.