Ashadhi Wari: माऊलींचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान! वारकऱ्यांच्या आगमनाने अलंकापुरी गजबजली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:05 AM2024-06-28T10:05:40+5:302024-06-28T10:06:13+5:30

Ashadhi Wari- पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल

Mauli's departure for Pandharpur tomorrow! Alankapuri was abuzz with the arrival of the warkars | Ashadhi Wari: माऊलींचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान! वारकऱ्यांच्या आगमनाने अलंकापुरी गजबजली

छायाचित्र - भानुदास पऱ्हाड

आळंदी: यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) आषाढी पायीवारीसाठी (Ashadhi Wari) उद्या (दि. २९) आळंदीतूनपंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यापार्श्वभूमीवर अलंकापुरीत वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आज (दि.२८) देहूनगरीतून तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने अनेक वारकरी आळंदीतून देहूकडे मार्गस्थ होत आहेत. दरम्यान अलंकापुरीही माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.

आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल होत असते. गुरुवारी (दि.२७) सायंकाळी अनेक वारकरी दिंड्यांसह आळंदीत दाखल झाले आहेत. परिणामी आळंदी भाविकांनी गजबजून निघाली आहे. आळंदीत दाखल होताच प्रथमदर्शी भाविक माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत.सद्यस्थितीत दर्शनरांग इंद्रायणी पलीकडे जाऊन पोहचली आहे. मात्र अनेक जण थेट मंदिरातून मुखदर्शनाचा लाभ घेत आहेत. 
                 
वाढती गर्दी लक्षात घेऊन आजपासून (दि.२८) महाद्वारातून वारकरी तसेच भाविकांना प्रवेश बंद केला जाणार आहे. दरम्यान टेम्पो, ट्रकमधून वारकरी भाविकांचे आगमन होत आहेत. तर काही वारकरी पायी चालत आळंदीत दाखल होत आहेत. भविकांच्या आगमनाने इंद्रायणी नदी तीर गजबजून निघाला आहे. इंद्रायणी तीरावर वासुदेवाच्या हरीनामाचा गजर ऐकू येत आहे. तर काही भाविक वारीची आठवण जतन करण्यासाठी इंद्रायणी नदीकाठावर आपल्या कुटंबियांसमवेत मोबाईलमध्ये छायाचित्रण करत असताना दिसून येत होते.
               
पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी शहरात अनेक हार प्रसाद फुलांची व वारकरी साहित्य वस्तूंची दुकाने सजलेली दिसून येत आहेत. मंदिरामधील दर्शनबारीत वारकरी भाविक 'ज्ञानोबा माऊलीचा' जयघोष करत आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरामध्ये क्षणभर विसवून हरीनामाचा जप करताना दिसत आहेत. भाविकांना आता माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याची आतुरता लागली आहे.

Web Title: Mauli's departure for Pandharpur tomorrow! Alankapuri was abuzz with the arrival of the warkars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.