माऊलींच्या रथाला यंदा नवा साज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:48 AM2018-06-11T02:48:57+5:302018-06-11T02:48:57+5:30
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा यंदा नव्या रथातून पंढरीकडे प्रस्थान करणार आहे.
पुणे - लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा यंदा नव्या रथातून पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. रथाला नवा साज चढविला असल्यामुळे दिमाखात पालखी सोहळा यंदा निघणार आहे. या रथासाठी वडगाव-मावळ येथील जाधव कुटुंबाने देणगी दिली आहे. रमेशभाई मिस्त्री यांच्या कारागिरीखाली हा नवा रथ तयार करण्यात येत आहे.
माउलींच्या पालखी सोहळ्याचा रथ खूप जुना झाला होता. या रथाची सातत्याने दुरुस्ती आणि डागडुजी करावी लागत होती. त्यामुळे नवा रथ घडविण्यात येणार होता. पण वडगाव-मावळ येथील माउलींचे भक्त जाधव कुटुंबीय पुढे आले आणि त्यांनी पालखी सोहळ्याच्या रथासाठी देणगी दिली. त्यामुळे माउलींचा पालखी सोहळा नव्या रथातून प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. माऊलींची पालखी घडविणाºया मिस्त्री कुटुंबाची चौथी पिढी या सेवेत आहे. देवस्थानांसाठी मूर्ती, रथ, सजावटीचे काम हे कुटुंब करते. माउलींच्या पालखी सोहळ्याचा नवा रथा घडविण्याचे काम रमेश, राजू आणि प्रकाशभाई मिस्त्री असे आम्ही तीन भाऊ आणि आमचे नऊ कारागीर मिळून गेल्या चार महिन्यांपासून करत आहेत. नवा रथ पूर्वीच्या रथाच्या तुलनेत वजनाने थोडा हलका आहे, तरी अधिक मजबूत, सुबकही आहे. आधीच्या रथाचे खांब पातळ होते, नव्या रथाचे खांब भरीव, मजबूत आहेत, असे रथ घडविणारे रमेशभाई मिस्त्री यांनी सांगितले. रथ घडविण्यासाठी जर्मन सिल्व्हरचा वापर करण्यात आला आहे. रथाच्या निर्मितीसाठी १३० किलो जर्मन सिल्व्हर तसेच १२० घनफूट सागवान लाकूड वापरण्यात आहे. रथाच्या निर्मितीसाठी सुमारे २० लाख रुपये खर्च आला, असेही मिस्त्री यांनी सांगितले.
-नव्या रथाचे वजन सुमारे दीड टन
- रथावर नक्षीदार कामाने सजलेल्या दहा महिरपी
-रथाला तोलण्यासाठी आठ मजबूत स्तंभ
- रथावर उभारलेले चार गज आणि तीन घुमट
-गरुड आणि हनुमंताच्या मूर्तीची प्रतिकृती
- रथाचे सौंदर्य खुलविणारे अकरा कळस