माऊलींच्या संजीवन सोहळ्याला आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:09+5:302020-12-08T04:10:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याला आळंदीत उद्या मंगळवारपासून (दि. ८) ...

Mauli's resurrection ceremony starts from today | माऊलींच्या संजीवन सोहळ्याला आजपासून प्रारंभ

माऊलींच्या संजीवन सोहळ्याला आजपासून प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याला आळंदीत उद्या मंगळवारपासून (दि. ८) प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा आयोजनावर अनेक मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. असे असले तरी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे वारकऱ्यांकडून स्वागत होत आहे. इतिहासात प्रथमच कार्तिकी वारी मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

मंगळवारी सकाळी सातला मंदिराच्या मुख्य महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता वीणामंडपात योगिराज महाराज ठाकूर यांच्यातर्फे कीर्तन सेवा होत आहे. तर रात्री ९ वाजता बाबासाहेब महाराज आजरेकर फड पंढरपूर यांचेतर्फे कीर्तन होईल. सोहळ्याची मुख्य पहाटपूजा शुक्रवारी (दि. ११) तर माऊलींचा संजीवन सोहळा रविवारी (दि. १३) पार पडणार आहे. दरम्यान सर्व अलंकापुरी या दिमाखदार सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. नगरपालिका, देवस्थान, पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

चौकट

शासनाने महाद्वारातील गुरू हैबतबाबा पायरीपूजनासाठी तीस लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. तर कार्तिकी एकादशी पहाटपूजेकरिता आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पन्नास लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर स्वच्छ करून सॅनिटायझर करण्यात आले आहे. ठिकठिकाणी सूचना देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोट

" कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा आदेश पाळून यात्रा पार पाडली जाईल. वारकऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी मंदिरात थर्मल स्कॅन करून प्रवेश दिला जाईल. परवानगीशिवाय अन्य कोणीही मंदिरात प्रवेश करू नये. मंदिर देवस्थान कमिटीला सहकार्य करावे.

- अॅड. विकास ढगे, विश्वस्त आळंदी देवस्थान.

फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.

Web Title: Mauli's resurrection ceremony starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.