माऊलींचा जयघोष अन् लाखो वैष्णवांसहित पालखीचे वैभवी प्रस्थान; ज्ञानोबा निघाले विठुरायाच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 07:13 PM2023-06-11T19:13:09+5:302023-06-11T19:13:41+5:30
वारकऱ्यांनी टाळ - मृदुगाच्या निनादात ‘ज्ञानोबा - तुकारामांचा’ जयघोष करत फेर, फुगड्यानी मंदिर परिसर अगदी दुमदुमून सोडला
भानुदास पऱ्हाड
आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९३ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वता:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा - माऊली - तुकारामांचा’ देहभान विसरून जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्ती सागरच लोटला आहे.
प्रस्थान सोहळ्यास रविवारी (दि.११) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधआरती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी बाराला ‘श्रीं’ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारी सुरु झाली. दुपारी अडीचच्या वाजता मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर विना मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आल्या. तद्नंतर ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले.
तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ - मृदुगाच्या निनादात ‘ज्ञानोबा - तुकारामांचा’ जयघोष करत फेर, फुगड्यानी मंदिर परिसर अगदी दुमदुमून सोडला होता. वारकऱ्यांच्या उत्साहाला आंनदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृदावन डोईवर घेऊन विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेली महिला वारकरी आणि यामध्ये सहभागी झालेले तरुण वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. सुमारे पाच तासांहून अधिक वेळ चाललेल्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात वारकरी भजनात अक्षरशः हरवून गेला. सायंकाळी उशिरा हा वैभवी सोहळा भरावरस्तामार्गे, भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारुती, चावडी चौक, महाद्वारचौकातून दर्शन मंडप इमारतीत पहिल्या मुक्कामासाठी विसावला.
* घंटानादाने पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ.
* धार्मिक वातावरणात व चैतन्यमय भक्तिरसात अलंकापुरी चिंब.
* प्रस्थान सोहळ्यासाठी जमला वैष्णवांचा अलोट भक्तिसागर.
* पोलिसांचा कडेकोट चोख बंदोबस्त.
* अलंकापुरी पताकांनी भगवीमय.
* फेर, फुगड्या... अन अभंग इंद्रायणी काठावर रंगला भक्तांचा आनंदमेळा.
पूजासमयी माऊलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक
माउलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान प्रसंगी पवमान अभिषेक, ११ ब्रम्हवृन्दांचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजासमयी माऊलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसून येत होते.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्य महाद्वारातून मानाच्या ४७ दिंड्याना मंदिरात प्रवेश दिल्यानंतर टाळ - मृदुंगाचा निनाद व ‘ज्ञानोबा तुकारामां’चा जयघोष अंगावर शहारे उमटवीत होता. फेर, फुगडी, मनोऱ्यामधून मनसोक्त बेभान होऊन वारकरी नाचत होते. याप्रसंगी मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रस्थान सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, माजी विश्वस्त अभय टिळक, तहसीलदार वैशाली वाघमारे, मालक बाळासाहेब आरफळकर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदिंसह वारकरी, मानकरी, सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.