मावळात मतमोजणी धिम्या गतीने, बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर
By नारायण बडगुजर | Published: June 4, 2024 10:34 AM2024-06-04T10:34:51+5:302024-06-04T10:35:02+5:30
दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीची घोषणा सकाळी १०.१५ वाजता करण्यात आली...
Maval Lok Sabha Result 2024| पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदार संघासाठी सकाळी आठ वाजता पासून मतमोजणी सुरू झाली. मात्र तांत्रिक बाबींमुळे पहिल्या फेरीतील मतमोजणी धिम्या गतीने सुरू होती. लोकसभा निवडणुकीचे कल सकाळपासून येत असतानाच मावळातील कलाबाबत उत्सुकता आहे. मात्र, पहिल्या फेरीच्या मतमोजणीच्या अधिकृत घोषणेस विलंब झाला. मात्र त्यानंतर दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरळीत झाली. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीची घोषणा सकाळी १०.१५ वाजता करण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, मतमोजणी केंद्रावर गैरसोय होत असल्याचे उमेदवार प्रतिनिधींनी तक्रार केली. पुरेशी व्यवस्था नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले. असे असले तरी कोणत्या उमेदवार आघाडीवर आहे आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे हे जाणून घेण्याबाबत मतदान केंद्रावरील उमेदवारांचे प्रतिनिधी व इतरांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून येते.
चौथ़्या फेरीअखेरीस बारणेंची आघाडी-
चौथी फेरीअखेरीस महायुती श्रीरंग बारणेंना (Shrirang Barne) १ लाख ३९ हजार मते मिळाली. महाआघाडी संजोग वाघेरे (Sanjog Waghere patil) यांना ८३ हजार ९८२ मते मिळाली. या फेरीअखेरीस बारणेंनी १६ हजार ५७ मतांची आघाडी घेतली आहे.