Maval Lok Sabha Result 2024:झाली रे झाली हॅट्ट्रिक झाली; श्रीरंग बारणे समर्थकांचा जल्लोष
By नारायण बडगुजर | Published: June 4, 2024 02:31 PM2024-06-04T14:31:37+5:302024-06-04T14:32:12+5:30
Maval Lok Sabha Result 2024 मावळात अकराव्या फेरीनंतर श्रीरंग बारणे (Shrirang Barne) ६७ हजार ५७६ मतांनी आघाडीवर
Maval Lok Sabha Result 2024 : लोकसभेच्या मावळ मतदार संघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. ही आघाडी कायम राहिल्याने बारणे दुपारी दोनच्या सुमारास बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. त्यावेळी समर्थकांनी जल्लोष केला. अकराव्या फेरीनंतर श्रीरंग बारणे ४ लाख ४८ हजार ९४८ तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे (Sanjog Waghere Pati) यांना ३ लाख ८१ हजार ३७२ मते मिळाली आहेत. बारणे ६७ हजार ५७६ मतांनी आघाडीवर आहेत.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय पाटील आणि एकनाथ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्यात सरळ लढत झाली. त्यामुळे मावळचा खासदार कोण होणार याबाबत उत्सुकता लागून होती. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात धिम्या गतीने मतमोजणी सुरू होती. पहिल्या फेरीपासूनच श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत शेवटच्या टप्प्यातील फेऱ्यांमध्ये देखील भरणे आघाडीवर राहिले. विजय दृष्टीपथात असल्याचा अंदाज आल्यानंतर श्रीरंग बारणे हे समर्थकांसह बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत घोषणाबाजी केली. महायुतीचा विजय असो, झाली रे झाली हॅट्ट्रिक झाली, घासून नाही ठासून आलो, अशा घोषणा समर्थकांनी दिल्या.
फटाके वाजवून आनंद
महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र परिसरात जल्लोष केला. गुलाल उधळत तसेच फटाके वाजवत आनंद व्यक्त केला. सकाळपासून उत्सुकता असलेल्या या निकालाचे चित्र दुपारी दोनच्या सुमारास स्पष्ट झाल्याचे दिसून आले.