मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०१९ : मावळमध्ये पार्थ पराभूत ,बारणेंच्या गळ्यात विजयाची माळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:07 PM2019-05-23T23:07:35+5:302019-05-23T23:07:43+5:30
मावळ निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करत रंगात निर्माण केली होती
पिंपरी : शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेना युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होती. या लढतीत श्रीरंग बारणे यांनी २, १५, ५७५ इतक्या मताधिक्यांनी विजय मिळवत विजयश्री खेचून आणली.
मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९पासून झाली. तेव्हापासून झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यापूर्वी घाटावरील खेड आणि बारामती, तर घाटा खालील रायगड या मतदारसंघात हा परिसर विभागला होता. मतदारसंघ निर्मितीनंतर झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघ शिवसेनेनं वरचष्मा राखला आहे. या यशाची पुनरावृत्ती श्रीरंग बारणे पुन्हा करतात, की पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला 'अच्छे दिन' दाखवतात, याबद्दल उत्सुकता आहे. राज्यातल्या प्रमुख लढतींपैकी एक मानली जाणारी ही लढत पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी विशेष प्रतिष्ठेची आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मावळमध्ये श्रीरंग बारणे यांना ७, १८,९५० मतं मिळाली असून पार्थ पवार यांच्या पारड्यात ५,०३,३७५ मते मिळाली आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २७ हजार ७३३ मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले आहे.
गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 60.11 टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळी श्रीरंग बारणे यांना 5 लाख 12 हजार 226 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार 293 मते मिळाली होती.