Maval Vidhan Sabha 2024 : कारभाऱ्याच्या निवडीसाठी शहरी-ग्रामीण मतदारांची गर्दी
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: November 21, 2024 12:54 PM2024-11-21T12:54:05+5:302024-11-21T12:56:27+5:30
मावळमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडून सुनील शेळके व अपक्ष बापू भेगडे यांच्यात तुल्यबळ लढत
पिंपरी :मावळ मतदारसंघात मतदान करवून घेण्यासाठी चुरस होती. वडगाव, तळेगाव, लोणावळा या शहरी भागातून सकाळच्या टप्प्यात जास्त मतदान झाले, तर दुपारनंतर ग्रामीण भागातील केंद्रांवर गर्दी होती. प्रमुख उमेदवारांनी सकाळीच मतदान करत केंद्रांना भेट दिली.
मावळमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडून सुनील शेळके व अपक्ष बापू भेगडे यांच्यात तुल्यबळ लढत आहे. मतदारसंघाचा बहुतांश भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगरदऱ्यांचा दुर्गम आहे. तरीही शहरातील मतदारांच्या तुलनेत हा मतदार अधिक सजग असल्याचे दिसून येत आहेत. सायंकाळी पाचपर्यंत मावळमध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते.
नऊनंतर मतदार केंद्रावर रांगा
सकाळी ७ वाजल्यापासून मतदार येत होते. त्यातही तरुणांचा समावेश जास्त होता. मात्र, नऊनंतर केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. उमेदवारांच्या स्थानिक नेत्यांची, कार्यकर्त्यांची मतदारांना आणण्याची लगबग सुरू होती.
दुपारनंतर शुकशुकाट
शहरी भागात सकाळी मतदान उत्साहात सुरू झाले. मात्र, दुपारी तीननंतर शुकशुकाट होता. काही मतदान केंद्रांवरील कार्यकर्ते मतदारांपैकी कोणी राहिले आहे का? याची चाचपणी करत मतदारांना शोधून आणून मतदान करायला लावत होते.
मतदान केंद्राबाबत गोंधळ
काही केंद्रांवर मतदारांची नावे याद्यांमध्ये नसल्याच्या किंवा मतदान केंद्र बदलल्याच्या तक्रारींमुळे मतदारांसह कार्यकर्त्यांची, अधिकाऱ्यांची गडबड उडत होती. तुरळक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत होते. पवन मावळ, आंदर मावळमधील ग्रामीण भागातील नागरिकांनी मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लावल्या होत्या. वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था प्रशासनाने केली होती.