आता मावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादीला की भाजपला?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 01:25 PM2023-07-03T13:25:01+5:302023-07-03T13:27:28+5:30
नवीन सत्तासमीकरणात मावळ विधानसभा राष्ट्रवादी की भाजपच्या वाट्याला जाणार आहे, अशी चर्चा रंगली आहे...
- विशाल विकारी
लोणावळा (पुणे) : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रविवारी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर इतर सहयोगी आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे नवीन सत्तासमीकरणात मावळ विधानसभा राष्ट्रवादी की भाजपच्या वाट्याला जाणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.
भाजपच्या मुशीमध्ये वाढलेले व तयार झालेले सुनील शेळके यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यामुळे गेल्या पंचवार्षिक काळात ऐन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. त्यानंतर शेळके यांनी भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांचा ९४ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. तेव्हापासून मावळ तालुक्यामध्ये भाजपविरुद्ध सुनील शेळके असा संघर्ष सुरू आहे. राजकीय पातळीवरील हा संघर्ष दोन्ही नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला होता. यामुळे आमदार सुनील शेळके व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये सतत धुसफूस होत होती.
गेल्या आठवड्यातदेखील वडगाव शहरामध्ये झालेल्या विकासकामांवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वार झाले होते. आता मात्र अजित पवार यांच्यासोबत सुनील शेळके हेदेखील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे मावळ तालुक्यात भाजप व राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध संपणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दोन्ही नेते एकत्र येणार का?
मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीविरुद्ध भाजप अशा निवडणुका झाल्या आहेत. आता मात्र हे दोन्ही पक्ष एकाच गटात आल्याने आगामी मावळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी की भाजप हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मावळ मतदारसंघातून सुनील शेळके यांनी दुसऱ्या टर्मसाठी तयारी केली आहे, तर भाजपकडून माजी मंत्री बाळा भेगडे व रवींद्र भेगडे हे तयारीमध्ये आहेत. शेळके यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर, तर भेगडे हे केंद्र व राज्य शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांच्या जोरावर रिंगणात उतरू पाहत आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविली, तर भाजपचे बाळा भेगडे व राष्ट्रवादी सुनील शेळके एकत्र येणार का? याविषयी कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.