मावळात संततधार; ओसंडले धबधबे
By admin | Published: June 26, 2017 03:54 AM2017-06-26T03:54:07+5:302017-06-26T03:55:08+5:30
परिसरात शनिवारी दिवस-रात्र झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्ते व काही सोसायट्या पाण्याखाली गेल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी/लोणावळा : परिसरात शनिवारी दिवस-रात्र झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्ते व काही सोसायट्या पाण्याखाली गेल्या होत्या. लोणावळा येथे शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवार सकाळी साडेआठ दरम्यान २४ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली.
रविवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दुपारनंतर मात्र पावसाने उसंत घेतली. २४ तास झालेल्या जोरदार पावसाने शहरातील बाजारपेठ, नांगरगाव, भांगरवाडी, तुंगार्ली, ट्रायोज मॉल रस्ता, मावळा पुतळा चौक, गवळीवाडा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. भांगरवाडी व नांगरगाव भागात नदी व नालेसफाई न झाल्याने पहिल्याच जोरदार पावसात अनेक सोसायट्या व घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. स्थानिक नगरसेवकांनी जेसीबी मशिनच्या साहाय्याने पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर केल्यानंतर व रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने हे पाणी खाली झाले. ओळकाईवाडी व भैरवनाथनगर परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. लोणावळा-पवनानगर हा राज्य महामार्ग पाणी भरल्याने वाहतुकीसाठी बंद झाला होता. गणपती मंदिर परिसरात ओढे नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसात नागरिकांना पुराचा सामना करावा लागला. कुणेगावमार्गे राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर डेल्ला हॉटेलसमोर सुमारे
दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर साचले होते. जागोजागी झालेली बांधकामे व भराव यामुळे पाण्याचे प्रवाह बंद झाल्याने सर्वत्र पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले.