विधानसभा निवडणूक निकालाविरुद्ध मविआची याचिका होणार दाखल
By राजू इनामदार | Published: December 11, 2024 08:44 PM2024-12-11T20:44:11+5:302024-12-11T20:44:11+5:30
सर्वोच्च न्यायालयात सदर याचिका शुक्रवारी किंवा सोमवारी दाखल होणार आहे.
पुणे : विधानसभा निवडणुकीतील पराभूत झालेल्या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणूक निकालाविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात सदर याचिका शुक्रवारी किंवा सोमवारी दाखल होणार आहे. काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनुसिंघवी यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जिल्ह्यातील मविआचे पराभूत उमेदवार व सिंघवी यांच्यात मंगळवारी रात्री चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे हडपसर विधानसभेचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. त्यांच्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व संगमनेर विधानसभेतील पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात व जिल्ह्यातील मविआचे सगळे पराभूत उमेदवार या बैठकीला उपस्थित होते.
सिंघवी यांनी सर्वांचे मुद्दे ऐकून घेतले. ईव्हीएमबद्दलच्या आक्षेपांवर त्यांनी विस्ताराने चर्चा केली. आयोगाने सांगितलेले सर्व शुल्क जमा केल्यानंतरही विशिष्ट संख्येतील यंत्रांमधील व्हीव्हीपॅट मोजले जातील व अन्य नियमच वारंवार सांगितले जातात, आकडेवारीतील तफावत, टक्केवारीत एका रात्रीत झालेला बदल वगैरे गोष्टींबाबत ते कसलाही खुलासा करायला तयार नाहीत, असे सिंघवी यांना सांगण्यात आले. त्यानंतर सिंघवी यांनी कोणत्या मुद्द्यांवर याचिका दाखल करता येईल याविषयी सांगितले. त्यासंबंधीची कागदपत्रे तयार करून शुक्रवारी किंवा सोमवारी याचिका दाखल करू, असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती जगताप यांनी दिली.