मे महिना हवाई क्षेत्रासाठी गेला ‘कोरडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:49+5:302021-05-17T04:09:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मे महिना हवाई क्षेत्रासाठी ‘कोरडा’ गेला. पुण्यासह देशातील विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मे महिना हवाई क्षेत्रासाठी ‘कोरडा’ गेला. पुण्यासह देशातील विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. एप्रिलपर्यंत पुणे विमानतळावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्याची संख्या १२ ते १३ हजार इतकी होती. ती आता दोन हजारांवर पोहोचली आहे. विमानांच्या संख्येतही घट झाली. देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी घट झाली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका हवाई क्षेत्राला बसला आहे. एप्रिल-मे महिना सुट्टीचा महिना असल्याने या महिन्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. मात्र महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुण्यातून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांच्या संख्येत घट होत गेली. या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दैनंदिन सरासरी १३ हजार प्रवासी ये-जा करत होते. मार्चमध्ये ही संख्या ७ ते ८ हजार इतकी झाली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही संख्या सरासरी १० ते १३ हजार इतकी होत गेली. नंतर मात्र संख्या उतरत गेली.
लॉकडाउनपूर्वी लोहगाव विमानतळाहून दिवसाला सरासरी १८० उड्डाणे होत होती. त्यातून सरासरी २५ ते ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते.
बॉक्स काय सांगतात आकडे :
तारीख प्रवासी प्रवासी विमाने
(आले) (गेले)
९ मे १४४५ १२५९ १३
१० मे १२३१ १२८७ १८
११ मे ७१० १०१७ १४
१२ मे १०८२ ११५८ १४
१३ मे ७६३ ८२७ १४
१४ मे ८२६ ८८६ ११
१५ मे १०२९ १०८१ ११
प्रवासी घटण्याची कारणे
- महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव.
- महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांवर अनेक राज्यांत निर्बंध; आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक.
- महाराष्ट्रातून गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेशला जाण्यासाठी चाचणी बंधनकारक.