‘माया केअर फाउंडेशन’च्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:05+5:302021-04-21T04:12:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘माया केअर फाउंडेशन’च्या संचालक आणि भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. विद्याताई गोखले (वय ८०) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘माया केअर फाउंडेशन’च्या संचालक आणि भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. विद्याताई गोखले (वय ८०) यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
गोखले बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी व्याख्याता होत्या. नाटक आणि नृत्य या कलांची आवड असलेल्या विद्याताईंनी राष्ट्र सेवा दलात राम नगरकर, सदानंद वर्दे, निळू फुले, वसंत बापट यांच्याबरोबर काम केले. ‘बिनबियांचे झाड’ या नाटकात त्यांनी निळू फुले यांच्यासोबत काम केले होते. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. भरतनाट्यम विषयामध्ये त्यांनी पुणे विद्याापीठची बी. ए. पदवी संपादन करून वयाच्या ४१ व्या वर्षी बालगंधर्व रंगमंदिरात त्यांनी अरंगेत्रम सादर केले होते. नृत्य साधना संस्थेमार्फत त्या भरतनाट्यम शिकवित होत्या. एकटे राहणारे वयोवृद्ध तसेच शारीरिक अपंग असलेल्या वृद्धांची सेवा करण्याच्या उद्देशातून मुलगी मंजिरी गोखले यांनी माया केअर फाउंडेशनची स्थापना केली. वृद्धांना वाचून दाखविणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे, डॉक्टरकडे घेऊन जाणे, औषधे आणून देणे अशी कामे संस्था करीत असते. विवाहानंतर मुलगी लंडनला स्थायिक झाल्यावर विद्याताई यांनी संस्थेची जबाबदारी यशस्वीपणे पेलली. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अहमदाबाद बंगलोर चेन्नई तसेच दुबई आणि लंडन येथे संस्थेच्या कार्याचा विस्तार झाला आहे.