मायबाप सरकारने मायबापासारखं वागावं; श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:33 IST2025-04-09T11:28:48+5:302025-04-09T11:33:16+5:30
आम्ही वारंवार मागणी करत आहोत, तरीही केवळ ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.

मायबाप सरकारने मायबापासारखं वागावं; श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांचे उपोषण
पुणे - भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. ९ एप्रिल) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला सुरुवात केली.
उपोषणस्थळी माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर आणि प्रशासनावर टीकास्त्र सोडले. आम्ही वारंवार मागणी करत आहोत, तरीही केवळ ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. मायबाप सरकारने मायबापासारखं वागावं, असं आम्हाला वाटतं,” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर विचारण्यात आलं असता, त्यांनी दोन्ही हात जोडून ‘राम कृष्ण हरी’ म्हणत त्यावर बोलणं टाळलं. आरोग्यदूत योजनेचा उल्लेख करत त्यांनी राज्य सरकारवर सवाल उपस्थित केला असता त्या म्हणाल्या, आरोग्यदूतची घोषणा सरकारने केली, पण त्याचं काय झालं? मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे. हा मृत्यू नव्हे, तर हत्या आहे,” असा घणाघात त्यांनी केला. सर्वसामान्य माणसाचा घराचा कर थकला तर त्याच्यावर कारवाई होते. मग इथे काय वेगळं?” असा सवाल करत त्यांनी रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी त्यांनी पुरंदर विमानतळासंदर्भातही खुली चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या उपोषणामुळे प्रशासन आणि सरकारला जाग येईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी गेल्या दि. ४ मार्च रोजी उपोषण करण्याचा इशारा सुळे यांनी दिला होता. परंतु तत्पूर्वी त्याअगोदर दि. ३ मार्च रोजी पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांनी सुळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल असा शब्द दूरधनीवरून सुळे यांना दिला होता. त्यानंतर सुळे यांनी उपोषण स्थगित केले होते. पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलेली डेडलाइन मागेच उलटून गेली. परंतु अद्यापही तेथे रस्त्याचे कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांना बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. हा रस्ता भाविकांना ये-जा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांना तसेच स्थानिकांनादेखील मोठा त्रास सहन करावा लागतो.
पण शासन व प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. बनेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी या रस्त्याचे क्रॉंक्रिटीकरण करावे म्हणून ग्रामस्थांसह आपण स्वतः वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यासाठी पत्रे पाठविली आहेत. अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सूचना देण्याबरोबरच निवेदने आणि ग्रामस्थांच्या सह्यांची पत्रेही वारंवार आपण दिली आहेत असे सुळे म्हणाल्या होत्या.