कदाचित चंद्रकांत पाटलांना केंद्रात मंत्री करणार असतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:40+5:302021-09-18T04:11:40+5:30
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केंद्रामध्ये मंत्री करणार असतील, तर मला माहीत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित ...
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केंद्रामध्ये मंत्री करणार असतील, तर मला माहीत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये ''मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या तीन-चार दिवसांत काय ते तुम्हाला दिसून येईल,'' असे वक्तव्य केले होते.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लढविले जात आहेत. यासंदर्भात पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ''मी माझ्या कामावर लक्ष देतो. चंद्रकांत पाटलांना केंद्रात मंत्री करणार असतील तर पंतप्रधान मोदींना माहीत असेल. मी विकासकामांना प्राधान्य देतो. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत आहे. राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ही परिस्थिती सांभाळून राज्यात विकासकामांकडे लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी आम्ही सकाळपासूनच कामाला लागतो.
-----
मराठा सेवा संघाला काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील :
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका मासिकातील लेखामधून भाजपशी युती करण्याचे सुतोवाच केले आहे. यासंदर्भात पवार म्हणाले,
''काही संघटना राजकारणविरहित विशिष्ट उद्देशाने काम करीत असतात. अनेकांना वाटते की आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाशी तरी युती करावी. त्यांना काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील.
-----