वादळी पावसाने घेतला मायलेकीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 05:15 PM2017-09-29T17:15:53+5:302017-09-29T17:48:40+5:30
घराची भिंत अंगावर पडल्याने दुपारी साडे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पुणे : पुण्यात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने आई आणि मुलीचा बळी घेतला आहे. तर तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. घराची भिंत अंगावर पडल्याने दुपारी साडे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शितल शेषनारायण क्षीरसागर (वय ३१), दिव्या शेषनारायण क्षीरसागर (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. तर प्रणव शेषनारायण क्षीरसागर (वय ३) हा मुलगा जखमी झाला आहे. क्षीरसागर कुटुंब मुळचे बीड जिल्ह्यातील असून पुण्यात मांजरी येथील गोपाळपट्टी येथे एका घरात भाड्याने रहात होते. शितल यांचे पती शेषनारायण हे टेम्पो चालक आहेत. तर शितल घरीच असायच्या.
शुक्रवारी दुपारी वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे त्यांच्या राहत्या घरातील भिंत पडली. घरात काम करीत असलेल्या शितल यांच्यासह दिव्या व प्रणव यांच्या अंगावर ही भिंत पडली. गंभीर जखमी झाल्याने शितल व दिव्या यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रणव गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दुर्घटना घडली तेव्हा शेषनारायण कामावर गेलेले होते.
घटनास्थळी तत्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पोलीस नाईक प्रकाश देसाई, ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे करत आहे.