महापौर बंगल्यात चोरट्यांंचा डल्ला
By admin | Published: December 30, 2014 12:18 AM2014-12-30T00:18:01+5:302014-12-30T00:18:01+5:30
शहराचे प्रथम नागरीक असलेल्या महापौरांच्या घोले रस्त्यावरील बंगल्यावरच रविवारी मध्यरात्री चोरटयांनी हात साफ केला आहे.
पुणे : शहराचे प्रथम नागरीक असलेल्या महापौरांच्या घोले रस्त्यावरील बंगल्यावरच रविवारी मध्यरात्री चोरटयांनी हात साफ केला आहे. विशेष म्हणजे या बंगल्याच्या आवारात तीन सुरक्षा रक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडला आहे. ही सुरक्षा व्यवस्था भेदून आत घुसलेल्या चोरटयांनी हॉलमधील 42 इंची एलसीडी टीव्ही लंपास केला आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार उजेडात आल्यानंतर या चोरीची तक्रार सोमवारी दुपारी डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल केला असल्याची माहिती महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांनी दिली. दरम्यान, बंगल्यावर रविवारी ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचा-यांची तत्काळ बदली करण्यात आली असून या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेकडून महापौरांसाठी घोले रस्त्यावर निवासस्थान बांधण्यात आले आहे. महापौरांकडून राहण्यासाठी या घराचा वापर केला जात नसला तरी, दिवसभरात अनेकदा महापौर दुपारचे जेवन तसेच बैठकासाठी या घराचा वापर करतात. त्यामुळे या बंगल्यावर नेहमीच वर्दळ असते. रविवारी रात्रीही नेहमी प्रमाणेच रात्री हा बंगला त्याचे व्यवस्थापन पाहणा-या शिपयांनी कुलूप लावून बंद केला होता. मात्र, सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे घराची स्वच्छता करण्यासाठी तसेच रात्री सुरू केलेले दिवे बंद करण्यासाठी हे सुरक्षा रक्षक घरात गेले असताना, हॉलमधील एलसीडी गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळातच हा एलसीडी चोरी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर तत्काळ या प्रकाराची माहिती घेऊन डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)
प्रथम नागरिकाचे
घरच ‘असुरक्षित’
शहराचे प्रथम नागरीक म्हणून महापौर ओळखले जातात. मात्र, या चोरीमुळे प्रथम नागरीकाचे घरही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. महापौरांचे घर असल्याने या ठिकाणी अनेकदा आमदार, खासदार, परदेशातून शहराच्या भेटीवर आलेले डेलीगेटस या ठिकाणी उपस्थित असताता, मात्र, या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतानाही एलसीडी चोरीस गेला आहे. त्यामुळे महापौर बंगला सुरक्षित आहे का हा सवाल उपस्थित केला जातोय.