महापौर, उपमहापौर, पदाधिकारी गायब

By admin | Published: August 5, 2015 03:08 AM2015-08-05T03:08:48+5:302015-08-05T03:08:48+5:30

महापालिकेच्या निमंत्रणपत्रिकेतून पुण्याचे प्रथम नागरिक असलेले महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांची नावे हद्दपार करण्याचा प्रताप

Mayor, deputy mayor, officer missing | महापौर, उपमहापौर, पदाधिकारी गायब

महापौर, उपमहापौर, पदाधिकारी गायब

Next

पुणे : महापालिकेच्या निमंत्रणपत्रिकेतून पुण्याचे प्रथम नागरिक असलेले महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांची नावे हद्दपार करण्याचा प्रताप वारजे व कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाने केला आहे. महापालिकेच्या राजशिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) निमंत्रणपत्रिकेतील आयुक्तांच्या जागेवर सहायक आयुक्त आणि महापौरांच्या नावाच्या जागेवर उपायुक्त यांची नावे झळकली आहे.
वारजे-कर्वेनगर व कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कचरा प्रक्रिया प्रदर्शन ७ आॅगस्टपासून तीन दिवस कोथरूड येथे होणार आहे. कचरा प्रक्रियेबाबत तंत्रज्ञान सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती व संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. निमंत्रणपत्रिकेत प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते होणार आहे. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये नव्याने स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची नावे ही आहेत. मात्र, पुण्यातील सर्वपक्षीय खासदार, विधानसभा व परिषदेचे सर्व आमदार, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, गटनेते अशोक हरणावळ, गणेश बिडकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे व बाबू वागसकर यांची नावे निमंत्रणपत्रिकेतून गायब आहेत.
महापालिकेची निमंत्रणपत्रिका प्रकाशित करण्यापूर्वी महापौर कार्यालयाकडून मान्यता घेणे आवश्यक असते. मात्र, वारजे-कर्वेनगर आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निमंत्रणपत्रिकेचा महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनाही पत्ता नाही. मात्र, निमंत्रणपत्रिका प्रकाशित होऊन निमंत्रणपत्रिका छापून आल्यातरी महापौर कार्यालयाला त्याचा कोणताही पत्ता नसल्याचा प्रकार मंगळवारी उजेडात आला.
सध्या महापालिकेचे राजशिष्टाचार अधिकारी रजेवर आहेत. त्यामुळे महापौरांचे स्वीय सहायक भगवान पंचमुख यांच्याकडे राजशिष्टाचार अधिकारी यांचा अतिरिक्त पदभार आहे. या प्रकाराविषयी पंचमुख म्हणाले, ‘‘महापालिकेच्या कोणत्याही कार्यक्रमांची निमंत्रणपत्रिका असली तरी प्रोटोकॉलनुसार महापौर, उपमहापौर, पदाधिकारी व गटनेत्यांची नावे आवश्यक असतात. मात्र, वारजे आणि कोथरूड कार्यालयाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाची व निमंत्रणपत्रिकेची कोणतीही माहिती महापौर कार्यालयाकडे आलेली नाही. त्यामुळे या कार्यक्रमांची निमंत्रणपत्रिका छापण्यास महापौर कार्यालयाने कोणतीही मान्यता दिलेली नाही.’’

Web Title: Mayor, deputy mayor, officer missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.