महापौरनिवड बिनविरोध?
By admin | Published: March 8, 2017 05:04 AM2017-03-08T05:04:51+5:302017-03-08T05:04:51+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडीतून राष्ट्रवादी माघार घेणार असल्याने भाजपाचा महापौर, उपमहापौरही
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडीतून राष्ट्रवादी माघार घेणार असल्याने भाजपाचा महापौर, उपमहापौरही बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीत तब्बल ७७ जागा भाजपाने पटकाविल्या, तर राष्ट्रवादी काँगे्रसला ३६ जागांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे संकेत पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील नगरसेवकांच्या बैठकीत दिले आहेत. त्यास या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. या दोन्ही पदांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी न उतरल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापौर, उपमहापौर पदासाठी भाजपाकडून अनेकजण इच्छुक आहेत. मंगळवारी महापौर पदासाठी नगरसचिव कार्यालयातून चार अर्ज नेण्यात आले, तर उपमहापौर पदासाठी एकूण
सहा अर्ज नेले. भाजपाने स्पष्ट
बहुमत मिळविल्याने महापौर, उपमहापौर यांच्या निवडी
बिनबिरोध होणार असल्याचे बोलले जात असले, तरी इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
तसेच या पदांवर आपल्या समर्थकालाच संधी मिळावी
यासाठी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. (प्रतिनिधी)
भाजपाचा पहिला महापौर, उपमहापौर कोण?
महापौर आणि उपमहापौरपदाची निवड १४ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. ९ मार्च रोजी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर १४ मार्चला होणाऱ्या निवडणुकीवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई हे पीठासन अधिकारी असतील. भाजपाकडून ९ मार्च रोजी महापौरपदासाठी एकच उमेदवारी अर्ज भरला गेल्यास भाजपाचा पहिला महापौर कोण, हे त्याच दिवशी स्पष्ट होईल.
दरम्यान, भाजपाकडून महापौरपदासाठी नामदेव ढाके, संतोष लोंढे, शत्रुघ्न काटे, केशव घोळवे, वसंत बोराटे यांची नावे आघाडीवर आहेत.