महापौरांनी सोडला लाल दिव्याचा सोस
By admin | Published: April 22, 2017 03:54 AM2017-04-22T03:54:42+5:302017-04-22T03:54:42+5:30
पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पुण्याचे महापौर यांनी आपापल्या वाहनावरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडचे महापौर
पिंपरी : पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पुण्याचे महापौर यांनी आपापल्या वाहनावरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांना गाडीवरील दिवा काढण्याचा सोस काही आवरत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यानंतर महापौर काळजे यांनीही आपल्या वाहनावरील लाल दिवा काढण्याची कार्यवाही शुक्रवारी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पक्षनेते एकनाथ पवार यांनी सर्वप्रथम महापालिकेचे वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी महापालिकेचे वाहन नाकारले. जनतेच्या पैशांची बचत व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते. तसेच पत्रकारांना स्थायी समितीच्या बैठकीस बसण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, महापौरांनी शासकीयच वाहन वापरणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते.
दरम्यान, जनता आणि सरकार यांच्यातील अंतर कमी व्हावे यासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहनावरील लाल दिवा हटविला. त्यानंतर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी लाल दिवा काढला. गुरुवारी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही आपल्या वाहनावरील दिवा काढला. पिंपरी-चिंचवडचे महापौर कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, त्यांनी दिवा काढण्याबाबत अनुत्सुकता दर्शविली. उलट लाल दिव्याचे समर्थन केले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ची घेतली दखल
नितीन काळजे म्हणाले, ‘‘महापौरांना विविध कार्यक्रमांसाठी बाहेर फिरावे लागते. त्यामुळे दिवा आवश्यक आहे. याबाबत नेत्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल.’’ असे विधान केल्याने महापौरांना लाल दिव्याच्या गाडीचा सोस असे वृत्त ‘लोकमत’च्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रकाशित झाले. याची दखल घेत वरिष्ठांकडून महापौर यांना आदेश देण्यात आले. पंतप्रधान व मुख्यमंत्री आपल्या गाडीवरील दिवा काढतात, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, अशी कानउघाडणी केली. त्यानंतर महापौरांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाहनावरील लाल दिवा काढला.