महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे
By admin | Published: March 9, 2017 04:24 AM2017-03-09T04:24:43+5:302017-03-09T04:24:43+5:30
महापालिकेमध्ये ९८ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविलेल्या भाजपाकडून महापौरपदासाठी मुक्ता टिळक, तर उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे
पुणे : महापालिकेमध्ये ९८ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविलेल्या भाजपाकडून महापौरपदासाठी मुक्ता टिळक, तर उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) नवनाथ कांबळे यांनी आज (बुधवारी) दुपारी नगरसचिव कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या १५ मार्च रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असली, तरी आता या निवडीची केवळ औपचारिकता उरलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत पार पडणार आहे.
महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज स्वीकारण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी नंदा लोणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काँग्रेसकडून लता राजगुरू यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून महापौरपदासाठी संगीता ठोसर यांनी व उपमहापौरपदासाठी विशाल धनवडे यांनी अर्ज भरला.
भाजपाकडून मुक्ता टिळक यांनी दाखल केलेल्या महापौरपदाच्या अर्जावर सूचक म्हणून सुनील कांबळे, मंगला मंत्री, योगशे मुळीक, धीरज घाटे यांनी व अनुमोदक म्हणून शंकर पवार, महेश वाबळे, दिलीप वेडे-पाटील, मंजूषा नागपुरे यांनी सह्या केल्या. रिपाइंचे नवनाथ कांबळे यांच्या अर्जावर सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, मानसी देशपांडे यांनी सूचक म्हणून व नीलमा खाडे, सोनाली लांडगे, फरजाना शेख यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या.
निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर मतदान होऊन भाजपा उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया पार पडेल. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीने महापौर आणि उपमहापौर पदांची निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे. पुण्यात मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस हे आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
टिळक वाड्याला महापौरपदाचा मान : लोकमान्य टिळकांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या टिळक वाड्याला मुक्ता टिळक यांच्या निमित्ताने महापौरपदाचा मान मिळणार आहे. टिळक यांचे मार्केटिंगमध्ये एमबीए झालेले आहे. त्याचबरोबर पत्रकारिता पदविका, जर्मन भाषा पदविका त्यांनी मिळविली आहे. मार्केटिंग व मार्केट रिसर्च अॅनेलिस्ट म्हणून विविध कंपन्यांसाठी काम केले आहे. भाजपाच्या नगरसेविका म्हणून त्या २००२मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या. त्यानंतर २००७, २०१२ व २०१७ अशा सलग ४ वेळा त्या पालिकेवर निवडून आल्या आहेत. सध्या भाजपाच्या शहर उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. भाजपा महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. लोकमान्य टिळक विचार मंच, आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संघटनेच्या उपाध्यक्ष, प्रेरणा महिला मंडळाच्या संस्थापक, महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाच्या उपाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत.
राष्ट्रवादीला दोन अपक्षांचा पाठिंबा : राष्ट्रवादी काँग्रेसला रामटेकडी-सय्यदनगर या प्रभाग क्रमांक २४ मधून निवडून आलेले अशोक धाकू कांबळे व रुकसाना इनामदार या दोन अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.
पक्षीय बलाबल
भाजपा९३ (एका अपक्षाच्या पाठिंब्यासह)
राष्ट्रवादी काँग्रेस४१ (२ अपक्षांचा पाठिंब्यासह)
शिवसेना१०
काँग्रेस१० (एका अपक्षाच्या पाठिंब्यासह)
रिपाइं०५
मनसे०२
एमआयएम०१
एकूण१६२
- महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर पदांसाठी बुधवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज स्वीकारण्यात आले.