पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची 'सोशल' सरशी; Twitter वर ठरले 'लखपती'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 07:22 PM2021-11-21T19:22:38+5:302021-11-21T20:11:04+5:30
मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी, त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे.
पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी ट्विटरवर एक लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. या टप्प्यासह मोहोळ भारताच्या महानगरातील महापौरांमध्ये ट्विटरवर (Twitter) सर्वाधिक लोकप्रिय महापौर झाले असून, त्यांना सर्वाधिक फॉलोअर्स असल्याची नोंद झाली आहे.
मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी, त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे. विशेष म्हणजे पुण्यासह महापौर मोहोळ यांना देशभरातून सर्वपक्षीय फॉलोअर्स मिळाले आहेत. देशातील महानगरात महापौर मोहोळ सर्वाधिक लोकप्रिय असताना त्यांच्या पाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा क्रमांक आहे. मात्र त्यातही पेडणेकर यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स मोहोळ यांना मिळाले असल्याची माहिती सहस्रजिथ क्रिएशन्सच्या सायली नलवडे यांनी दिली.
महापौरांमध्ये अधिक फॉलोअर्स असणारी शहरे
१. पुणे: मुरलीधर मोहोळ :- १ लाख +
२. मुंबई: किशोरी पेडणेकर :- ४९ हजार+
३. हैदराबाद: विजयालक्ष्मी गडवाल :- २३ हजार+
४. आग्रा: नवीनकुमार जैन :- ९ हजार +
५. सुरत: हेमाली बोघावाला :- ८ हजार+
६. अहमदाबाद : कीर्तीकुमार परमार :- ४ हजार+
नागरिकांकडून ट्विटवर नव्या कल्पना, सूचना, समस्या याची थेट माहिती मिळाली
''महापौरपदाची जबाबदारी आल्यावर प्रत्यक्ष फिल्डवर काम करतानाच, समाज माध्यमाचा वापर करण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पुण्यासारख्या महानगराचे नेतृत्व करत असताना नागरिकांकडून ट्विटवर नव्या कल्पना, सूचना, समस्या याची थेट माहिती मिळत राहिली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.''