पुणेकरांच्या पाण्यासाठी महापौरांचा रुद्रावतार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 08:23 PM2019-01-16T20:23:57+5:302019-01-16T20:26:20+5:30
पाटबंधारे विभागाकडून पुणेकरांना वेठीस धरण्याचे काम सुरु असून, कोणतीही पूर्व कल्पना न देता बुधवारी (दि.१६) अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला.
पुणे: पाटबंधारे विभागाकडून पुणेकरांना वेठीस धरण्याचे काम सुरु असून, कोणतीही पूर्व कल्पना न देता बुधवारी (दि.१६) अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला. पाटबंधारे विभागाच्या या मनमानी कारभाराचे तीव्र पडसाद महापालिकेच्या वर्तुळात उमटले. मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील पाटबंधारे विभागाचे अधिकारी ऐकत नसतील तर मुजोर अधिका-यांवर कारवाई करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक स्वत: गुरुवार (दि.१७) रोजी सिंचनभवन येथे जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. दरम्यान पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना शहरामध्ये फिरकू देणार नाही, असा इशाराही टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
महापालिका कालवा समिती व जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाचा दाखला देत पाटबंधारे विभागाने गेल्या काही दिवसांत तीन वेळा अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, शहरात पाणी कपात करण्यात येऊ नये अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिका-यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. पुणे दौ-यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करू नये असे थेट आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले होते. त्यानंतर देखील पुण्यातील पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार सुरुच असून, बुधवारी (दि.१६) दुपारी पर्वती पंपिंग स्टेशनचा पाणी पुरवठा अचानक बंद केला. यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले. महापौर मुक्ता टिळक यांनी याप्रकरणी जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क साधून पाणी पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे.