निवडणुकीत यश मिळवून देऊ शकणाराच महापौर
By admin | Published: February 3, 2016 01:46 AM2016-02-03T01:46:36+5:302016-02-03T01:46:36+5:30
महापालिकेच्या आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळवून देऊ शकेल अशा नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लागणार आहे
पुणे : महापालिकेच्या आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळवून देऊ शकेल अशा नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळविलेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीमध्ये सक्षम नेतृत्व देऊ शकेल अशा माननीयांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदाची माळ घातली जाणार आहे.
महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असला तरी एका टर्ममध्ये सव्वा-सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी दोघांना महापौरपदाची संधी दिली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी महापालिकेमध्ये सत्तेवर आल्यानंतरच स्पष्ट केले होते. त्यानुसार पहिल्या टर्ममध्ये वैशाली बनकर व चंचला कोद्रे यांना संधी देण्यात आली.
दत्तात्रय धनकवडे यांचाही सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर इच्छुकांनी महापौर पदासाठी प्रयत्न केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम पार पडल्यानंतर (२० डिसेंबर २०१५) महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी त्यापूर्वीपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, धनकवडे यांचा राजीनामा लांबल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
मंगळवारी अखेर धनकवडे यांना राजीनामा सादर झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक विकास दांगट, दीपक मानकर, प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे, चेतन तुपे, सुभाष जगताप, बाळासाहेब बोडके महापौर पदासाठी इच्छुक आहेत.