पुणेकरांच्या लसीसाठी महापौरांची दिल्ली वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:22+5:302021-05-27T04:12:22+5:30
पुणे : केंद्र सरकारकडून परवानगी आणा तुम्हाला आम्ही लागलीच लस देतो, असे पत्र सिरम इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेला दिले आहे. ...
पुणे : केंद्र सरकारकडून परवानगी आणा तुम्हाला आम्ही लागलीच लस देतो, असे पत्र सिरम इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेला दिले आहे. यामुळे पुणेकरांच्या लसीसाठी आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला असून, याकरिता या आठवड्यात मोहोळ यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची वेळ घेतली आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार सिरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे वाटप सुरू आहे. सध्या केंद्राला ५० टक्के व राज्यांना तसेच खुल्या बाजारात ५० टक्के अशा रितीने लसीचे वितरण सुरू आहे. त्यामुळे एकट्या पुणे महापालिकेला आम्हाला केंद्राच्या आदेशाशिवाय लस देता येणार नाही, असे पत्रच महापालिकेला सिरमने पाठविले होते. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आता थेट भेट घेऊन पुणेकरांच्या लसीसाठी त्यांना साकडे घालण्याचा निर्णय मोहोळ यांनी घेतला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेला लस खरेदीसाठी काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडरला मिळालेला प्रतिसाद पाहता येत्या दोन दिवसांत पुणे महापालिकाही ग्लोबल टेंडरची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली आहे.
-----------------------