महापौरांचा काटकसरीचा सल्ला
By admin | Published: March 16, 2017 02:13 AM2017-03-16T02:13:34+5:302017-03-16T02:13:34+5:30
पुणे शहराचा विकास हेच भाजपाचे एकमेव ध्येय आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी व अन्य मोठ्या प्रकल्पांसाठी निधी लागेल.
पुणे : पुणे शहराचा विकास हेच भाजपाचे एकमेव ध्येय आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी व अन्य मोठ्या प्रकल्पांसाठी निधी लागेल. केंद्र व राज्य सरकारकडून तो मिळवला जाईलच; पण स्थानिक स्तरावरही काटकसर केली जाईल. यापुढे दिखाऊ कार्यक्रमांना फाटा देण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी आपल्या पहिल्याच वार्तालापात स्पष्ट केले. पर्यावरण तसेच महिला सुरक्षा आदी मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.
महापौरपदी निवड झाल्यानंतर महापौर कार्यालयात मुक्ता टिळक यांनी पत्रकारांशी आपला पहिलाच संवाद साधला. त्यांच्यासमवेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, ‘‘आमच्यावर मोठी जबाबदारी आहे, याची पूर्ण जाणीव आहे. मेट्रोच्या कामाचे आम्ही फक्त भूमिपूजन केले नाही तर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. नदीसुधारसाठीचा निधीही प्राप्त झाला आहे, तेही काम सुरू करण्यात येईल. रेंगाळलेले असे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यावर आगामी काळात भर देण्यात येणार आहे.’’
पुणे शहराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यात सुचविलेल्या कामांसाठी मोठ्या निधीची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारची आर्थिक मदत होईलच; पण त्याशिवाय स्थानिक स्तरावर निधी उभा करण्यासाठी काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील, असे स्पष्ट करून महापौर म्हणाल्या, ‘‘कडू औषधानेच रोग बरा होतो. मात्र त्याचबरोबर महापालिकेच्या खर्चात आवश्यक तिथे काटकसरही केली जाईल. दिखाऊ कार्यक्रमांना फाटा देण्यात येईल.’’ कडू औषध म्हणजे मिळकतकरात वाढ करणार का, या प्रश्नावर महापौरांनी ते आता नाही, नंतर कळेल, असे म्हणत टोलवला.
शहरात सिमेंटचे जंगल वाढत चालले आहे. त्यासाठी पर्यावरणविषयक उपक्रम राबवण्याला आपण प्राधान्य देऊ, असे महापौरांनी सांगितले. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प महापालिकेच्या प्रत्येक इमारतीमध्ये राबवता येईल का याची तपासणी करू.
त्याचबरोबर वृक्षारोपणाचे कार्यक्रमही ठिकठिकाणी आयोजित करण्यात येतील. झोपडपट्टीमधील रहिवाशांना परवडणारी घरे देण्यासाठी त्या प्रकारच्या योजना तयार करण्यात येतील. सार्वजनिक आरोग्यांच्या सुविधाही त्यांना अल्प दरांमध्ये मिळाव्यात यासाठी प्रयत्न करू, असे महापौर म्हणाल्या. महिला सुरक्षा हासुद्धा आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचा विषय असेल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)