महापौरांची मध्यस्थीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 07:14 AM2018-05-30T07:14:33+5:302018-05-30T07:14:33+5:30
शिवराळ शब्दांच्या वापरावरून गाजत असलेल्या महापालिकेतील काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे व भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी
पुणे : शिवराळ शब्दांच्या वापरावरून गाजत असलेल्या महापालिकेतील काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे व भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. या प्रकरणासंबंधाने निवेदन घेऊन आलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला त्यांनी तसे सांगितले. त्यानंतर लगेचच भाजपा युवा मोर्चाच्या वतीनेही महापौरांना निवेदन देऊन शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी महापौर टिळक यांची भेट घेण्यात आली. विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक राजधानी असा मान असलेल्या पुणे शहरात महापालिकेत असा प्रकार घडणे दुर्दैवी आहे. सध्या महापालिकेत मुख्य इमारत, तसेच अन्य अधिकाऱ्यांची कार्यालये यांमध्ये झुंड करून उभे राहणे, त्यांना धमकावणे असे प्रकार होत आहेत. महापालिका सभागृहात तसेच सभागृहाच्या बाहेरही सर्व पक्ष विकासाच्या प्रश्नावर, योजनांवर एकमताने निर्णय घेतात, याची अनेक उदाहरणे आहेत. शिंदे हे काँग्रेसचे गटनेते असून अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे नगरसेवक आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप करणे काँग्रेस पक्ष यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा या वेळी बागवे यांनी दिला.
त्यांच्यासमवेत प्रदेश समितीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, स्वत: नगरसेवक अरविंद शिंदे, नगरसेवक वैशाली मराठे, लता राजगुरू, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, संगीता तिवारी, महिला अध्यक्ष सोनाली मारणे व अन्य पदाधिकारी होते. महापौरांनी यात लक्ष घालावे, योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी बागवे यांनी केली.
भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे यांच्या नेतृत्वाखाली सुनील मिश्रा, किरण ओरसे, शशांक सुर्वे, जयदीप पारखी, नगरसेवक सुशील मेंगडे, प्रतीक देसर्डा आदींनी महापौरांना निवेदन दिले.
आता दावा १०० कोटींचा
पुणे : महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना, मंगळवारी १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याबाबत वकिलामार्फत नोटीस बजावली. ४८ तासांच्या आत माफी मागितली नाही, तर खटला दाखल करण्याचा इशारा भिमाले यांनी दिला आहे.
महापालिका सर्वसाधारण सभेत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या एका विषयावरून भिमाले व त्यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. भिमाले यांनी वापरलेल्या अपशब्दांचा आधार घेत शिंदे यांनी याआधीच पोलिसांकडे फिर्याद दिली असून, त्याशिवाय २५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला आहे. प्रत्युत्तरादाखल भिमाले यांनीही त्यांना या संदर्भात वकिलाच्या माध्यमातून नोटीस बजावली आहे.
शिंदे यांनी भिमाले यांना सभागृहात जाहीरपणे अयोग्य शब्द वापरले. फेसबुकवरही अशिष्ट शब्दांत उल्लेख केला. सन २०१४मध्ये काँग्रेसची महापालिकेतील सत्ता गेली; त्यामुळे शिंदे भाजपाचा द्वेष करीत असतात. नैराश्यातून ते
भाजपा व पदाधिकारी यांच्या सातत्याने बदनामी करण्याचा
प्रयत्न करीत आहेत.