नदीप्रदूषण रोखण्याचे महापौरांचे आदेश
By admin | Published: April 1, 2017 01:53 AM2017-04-01T01:53:07+5:302017-04-01T01:53:07+5:30
वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात आळंदीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
पिंपरी : वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात आळंदीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नद्यांच्या प्रदूषणाबाबत दिलेल्या निर्देशानुसार महापौर नितीन काळजे यांनी आज पर्यावरण, आरोग्य व जलनि:सारण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कामकाजासंदर्भात बैठक घेतली.
महापौर कार्यालयातील बैठकीस सह शहर अभियंता रविंद्र दुधेकर, क्षेत्रीय अधिकारी चंद्रकात खोसे, कार्यकारी अभियंता, संजय कुलकर्णी, संजय भोसले आदी उपस्थित होते. शहरातून वाहणा-या इंद्रायणी, मुळा, व पवना नद्यांच्या प्रदूषणाबाबत सुधारणा करणेकामी महापौर काळजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. यामध्ये पवना आणि मुळा नदीवरील मोठ्या प्रमाणात असलेली जलपर्णी कायमस्वरुपी हटविणे. इंद्रायणी नदी प्रदुषण मुक्त करणेबाबत कार्यवाही करणे, आगामी काळात पिंपरी चिंचवड महापालिके तर्फे आळंदीकरीता शुध्द पाणी पुरविणे. ई कचरा विल्हेवाट लावणे. सांडपाणी प्रकल्पांची संख्या वाढविणे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पांचे काम मार्गी लावणे. शहरातील मोठी रुग्णालये व हौसिंग सोसायट्यांना सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे, याबाबतीतही अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत डेटा बेसीस सर्व्हिसेसचे कामकाजाबाबतही मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण यांचे समवेत चर्चा झाली. लवकरच कन्सल्टंट नेमून सादरीकरण करण्याचे आदेशही देण्यात आले. (प्रतिनिधी)