मयूरेश्वराला पाच दिवस जलस्नान
By Admin | Published: September 2, 2016 05:35 AM2016-09-02T05:35:27+5:302016-09-02T05:35:27+5:30
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील भाद्रपदी यात्रा उत्सव शुक्रवार (दि. २) पासून सुरू होणार आहे. यानिमित्त यंदा तिथीचा क्षय नसल्याने सलग पाच दिवस भाविकांना
मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील भाद्रपदी यात्रा उत्सव शुक्रवार (दि. २) पासून सुरू होणार आहे. यानिमित्त यंदा तिथीचा क्षय नसल्याने सलग पाच दिवस भाविकांना मयूरेश्वरास जलस्नान घालता येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत मोरगाव ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे उपसरपंच दत्तात्रय ढोले यांनी सांगितले.
अष्टविनायक आराध्य दैवत मोरगाव येथील भाद्रपदी यात्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असल्याने मोरगाव ग्रामपंचायत व देवस्थानने जय्यत तयारी केली आहे. यात्रेनिमित्त शुक्रवार (दि.२) ते बुधवार (दि. ६) पर्यंत पहाटे पाच ते दुपारी १२ पर्यंत ‘श्रीं’चा मुख्य गाभारा सर्व धर्मीयांसाठी जलस्नान व अभिषेक पूजा घालण्यासाठी खुला करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यभरातून भाविक मोरगाव येथे येतात. मंदिराच्या ४ दिशांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशी द्वार मंदिर आहेत. येथे चालत जाऊन दुर्वा-फुले-शमी वाहण्याची विशिष्ट अशी प्रथा आहे. या यात्रेची सुरुवात गणेश योगींद्राचार्य यांनी सुमारे ५०० वर्षांपूर्वी सुरू केली होती. आजही ती प्रचलित आहे.
द्वारयात्रा भाद्रपद शुद्ध प्रतिपदा (दि.२) ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी (दि. ५) पर्यंत होणार आहे. यानिमित्त कर्नाटक राज्यातून शेकडो भाविक येतात. यात्रेनिमित्त देवस्थानच्या वतीने मंदिरात दर्शन रांग, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, सफाई कामगार आदींची सुविधा निर्माण केली आहे. मोरया गोसावीप्राप्त मंगलमूर्तीच्या पालखी सोहळ्याचे चिंचवडवरून आगमन रविवार, दि. ४ रोजी रात्री ९ वाजता होणार आहे. यात्रा कालवधीत शेंदूरपुडा, पळीपूजा, मोरया गोसावीलिखित पद, टिपऱ्या, छबिना आदी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यात्रेमुळे गावात पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे.
यंदाही टँकरचे पाणी
यंदाही तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने दडी मारली असल्याने भाविकांना अंघोळ करण्यासाठी गणेशकुंडात टँकरद्वारे पाणी सोडले
जाणार आहे. मयूरेश्वर मंदिरामध्ये भाद्रपदी यात्रा मंडळाकडून दि. ६ रोजी भजनांची हजेरी कार्यक्रम व महा भंडारा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या कार्यकारिणीने केला आहे.